पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी,
कर्जमुक्तीची नवी पहाट
कृषिप्रधान भारत देशातील सर्वच राज्ये प्रामुख्याने
शेतीवर अवलंबून आहेत. त्यात गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना, पैनगंगा, वैनगंगा, पुर्णा
आदी नद्यांच्या खोऱ्यांत वसलेल्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचाही कणा हा
प्रामुख्याने शेतीच होय. राज्यातील लाखो शेतकरी अन्नधान्य उत्पादनाबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला
गती देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. मात्र गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस, दुष्काळ,
अतिवृष्टी, गारपीट, बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, बाजारपेठेतील अस्थिरता आणि शेतीमालाला
अपेक्षित भाव न मिळणे अशा विविध कारणांमुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या परिस्थितीत शेतीसाठी शेतकऱ्यांनी विविध बँकाकडून निकड भागविण्यासाठी पीककर्ज घेतले.
या पीक कर्जाची परतफेड करणे अनेक शेतकऱ्यांना कठीण झाले. परिणामी कर्जाचा बोजा वाढत
गेला आणि त्याचा परिणाम शेती उत्पादनासह ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही झाला.
ही परिस्थिती
लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने शेतकऱ्यांना
आर्थिक दिलासा देण्यासाठी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
2026" सुरू केली आहे. ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना
आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, नियमित कर्जफेडीला प्रोत्साहन देणे, बँकिंग व्यवस्थेवरील
विश्वास दृढ करणे आणि शेती विकासाला दीर्घकालीन चालना देणे हा या योजनेचा व्यापक उद्देश
आहे.
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रमुख उद्दिष्टे ही पात्र शेतकऱ्यांना
कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करून त्यांना नव्याने शेती करण्यासाठी आर्थिक बळ देणे. शेतकऱ्यांची
पत सुधारून त्यांना भविष्यात सहजपणे पीक कर्ज उपलब्ध होणे, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा
वापर वाढणे, उत्पादन खर्चासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला
चालना मिळणे आहेत. परिणामी शेतकऱ्यांना पुन्हा संकटातून बाहेर काढणे आवश्यक आहे. त्यातून
त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि पुन्हा नव्या उमेदीने शेती व्यवसायाकडे वळू लागतील.
या योजनेअंतर्गत सर्वच पात्र शेतकऱ्यांना कमाल दोन
लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाची कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमितपणे
कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर लाभ देण्याची तरतूद करण्यात आली
आहे. थकीत कर्जदारांसाठी वन टाइम सेटलमेंट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याद्वारे
एकरकमी सेटलमेंट करून पुन्हा बँकिंग व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी आतापर्यंत
कर्जापायी वंचित रहिलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे.
राज्य
शासनाने आणलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळविण्यासाठी
शेतकऱ्यांनी अँग्रीस्टँकवर नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची अचूक पडताळणी होऊन या योजनेतील पारदर्शकता वाढणार आहे.
जमीन, पीक, शेतकरी आणि बँकिंग माहितीचे एकत्रीकरण झाल्याने योजनांचा लाभ जलद आणि योग्य
लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे शक्य होईल.
या कर्जमुक्ती
योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. शासनाने निश्चित
केलेल्या कालावधीत घेतलेले अल्पमुदतीचे पीक कर्ज पात्र ठरणार आहे. राष्ट्रीयकृत बँका,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, नागरी सहकारी बँका, पतसंस्था आणि शासन
मान्य वित्तीय संस्थांकडून घेतलेले पात्र कर्ज विचारात घेतले जाणार आहे. याशिवाय आधार
प्रमाणीकरण, अँग्रीस्टँक नोंदणी आणि जमिनीच्या नोंदी अद्ययावत असणे आवश्यक आहे.
पात्र
शेतक-यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक, कर्ज खाते
तपशील किंवा कर्ज प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक आणि शासनाने वेळोवेळी मागितलेली इतर आवश्यक
कागदपत्रे सादर करावी लागतील.
शासनाने
निश्चित केलेल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे किंवा संबंधित बँक, सेवा केंद्र अथवा अधिकृत
कार्यालयामार्फत अर्ज करता येणार आहे. अर्जानंतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली
जाईल. पात्रता निश्चित झाल्यानंतर लाभ मंजूर करून कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण करण्यात
येईल.
एकदा कर्जमुक्त झालेला शेतकरी नव्या जोमाने शेतीमध्ये
गुंतवणूक करू शकतो. सुधारित बियाणे, आधुनिक अवजारे, सिंचन सुविधा, सेंद्रिय शेती, पीक
विविधीकरण आणि कृषी प्रक्रिया उद्योगांकडे वळण्यासाठी आवश्यक आर्थिक क्षमता निर्माण
होते. त्यामुळे केवळ शेतकरीच नव्हे तर ग्रामीण बाजारपेठ, कृषी सेवा क्षेत्र आणि स्थानिक
रोजगारालाही चालना मिळते. तसेच योजनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सन्मान
राखण्यात आला आहे. वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याची
तरतूद असल्यामुळे आर्थिक शिस्त निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे भविष्यातील कर्जपुरवठा
अधिक सुलभ होईल आणि बँकांवरील विश्वास वाढेल.
हिंगोली
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार आवश्यक कागदपत्रे
तयार ठेवून ॲग्रीस्टँक नोंदणी पूर्ण करावी. अधिकृत माहिती, पात्रता आणि अर्ज प्रक्रियेबाबत
संबंधित बँक, कृषी विभाग, तहसील कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. अफवांवर
विश्वास न ठेवता शासनाच्या अधिकृत सूचनांनुसारच कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी
राहुल गुप्ता यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना केले आहे.
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही केवळ कर्जमाफी योजना नसून शेतकऱ्यांच्या
आर्थिक पुनर्बांधणीचा, स्वाभिमानाचा आणि शेती विकासाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. कर्जमुक्त
शेतकरी हा सक्षम आणि समृद्ध ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहे. शासनाच्या या योजनेचा
लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक, शाश्वत आणि आत्मनिर्भर शेतीकडे वाटचाल करावी.
पुण्यश्लोक
अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना ही "शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी... कर्जमुक्तीची
नवी पहाट!"च ठरणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
– जिल्हा
माहिती कार्यालय, हिंगोली

No comments:
Post a Comment