29 July, 2026

'पराक्रम दिना'निमित्त राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन

 

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त 1 ते 15 ऑगस्टदरम्यान राज्यभर विविध स्पर्धा


हिंगोली (जिमाका), दि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त 18 ऑगस्ट हा दिवस राज्यभर 'पराक्रम दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, जिल्ह्यातील विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा परिचय नवीन पिढीला व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. 'पराक्रम दिन' साजरा करण्यासाठी अमृत संस्थेमार्फत 'पराक्रम दिन समिती' स्थापन करण्यात आली असून, समितीमध्ये काकासाहेब विधाते, पांडुरंग बलकवडे, जगन्नाथ लडकत, मोहन शेटे, मंगेश खाडिलकर व श्रीमती कौमुदी परांजपे या इतिहास अभ्यासकांचा समावेश आहे.

या स्पर्धांमध्ये निबंध, वक्तृत्व आणि रिल्स या तीन प्रकारांचा समावेश असून निबंध व वक्तृत्व स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी, तर रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.

निबंध स्पर्धेसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत जास्तीत जास्त एक हजार शब्दांचा निबंध टंकलिखीत (टाईप) करून त्याची पीडीएफ स्वरूपातील प्रवेशिका सादर करावी लागणार आहे. वक्तृत्व स्पर्धेत स्पर्धकांनी स्वतःच्या भाषणाचा जास्तीत जास्त सात मिनिटांचा दर्जेदार व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक असून, त्यामध्ये कोणतेही व्हिज्युअल किंवा साऊंड इफेक्ट्स तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) द्वारे तयार केलेल्या प्रतिमांचा वापर करता येणार नाही. रिल्स स्पर्धेसाठीही प्रवेशिका 1 ते 15 ऑगस्ट 2026 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत.

स्पर्धांचे विषय, नियमावली, बक्षिसांची माहिती, सहभाग नोंदणीची प्रक्रिया तसेच संदर्भ साहित्य https://parakramdin.mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जीवनकार्यावरील निवडक संदर्भ पुस्तके तसेच ई-बुकही या संकेतस्थळावर उपलब्ध असून, स्पर्धेतील विषय आणि प्रश्नावली याच संदर्भ साहित्याच्या आधारे तयार करण्यात आली आहे.

राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापक यांनी केले आहे.

******

No comments: