24 July, 2026

उपवासात भगर खाताना घ्या योग्य काळजी; अन्न विषबाधा टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन

 


* पॅकबंद व दर्जेदार भगरच वापरा; साठवणूक आणि वापराबाबत घ्या आवश्यक खबरदारी – सहायक आयुक्त (अन्न) पवनकुमार खताळ



हिंगोली (जिमाका), दि. २४ : आषाढी एकादशीसह विविध उपवासांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भगरीचे सेवन केले जाते. मात्र, भगर खाल्ल्यानंतर अन्न विषबाधा झाल्याच्या घटना राज्यात वारंवार घडत असल्याने नागरिकांनी भगर खरेदी, साठवणूक व वापरताना आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) पवनकुमार खताळ यांनी केले आहे.

भगर हा वरई, सावा, बर्टी व कोद्रा या भरड धान्यांपासून तयार होणारा पौष्टिक आहार असून त्यामध्ये कार्बोहायड्रेट, आहारातील तंतू (डायटरी फायबर), कॅल्शियम, फॉस्फरस व मॅग्नेशियम यांसारखी खनिजे आढळतात. तसेच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेही रुग्णांसाठीही तो उपयुक्त मानला जातो.

मात्र, अयोग्य साठवणुकीमुळे भगरीवर अँस्परजिलस टँमारी या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या बुरशीमुळे फ्युमिगाक्लेव्हीन-ए, सायक्लोपायाझॉनिक आम्ल, अँफ्लाटॉक्सिन व इतर मायकोटॉक्सिन्स तयार होण्याची शक्यता असते. विशेषतः २५ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान व आर्द्र वातावरणात बुरशीची वाढ वेगाने होत असल्याने अशा भगरीचे सेवन केल्यास अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.


*भगर वापरताना घ्यावयाची काळजी*


शक्यतो पॅकबंद व नामांकित कंपनीची भगरच खरेदी करावी.

पॅकेटवरील पॅकिंग दिनांक, अंतिम वापर दिनांक, उत्पादकाची माहिती व परवाना तपासावा.

भगर स्वच्छ, कोरड्या व हवाबंद डब्यात साठवावी आणि दीर्घकाळ साठवून ठेवू नये.

तयार दळलेले भगरीचे पीठ खरेदी करण्याऐवजी आवश्यकतेनुसार ताजे दळून वापरावे.

शक्यतो जाड (कोद्रा) भगर टाळावी.

सलग दोन-तीन दिवस उपवास असल्यास भगर व शेंगदाण्याचे अति सेवन टाळावे. पचनशक्तीनुसार मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.

भगरीच्या भाकरी किंवा दशम्यांपेक्षा भगराची खिचडी खाण्यास प्राधान्य द्यावे.


*विक्रेत्यांसाठी सूचना*


अन्न व औषध प्रशासनाने विक्रेत्यांनाही काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार केवळ पॅकबंद भगरचीच विक्री करावी, घाऊक विक्रेत्याकडून खरेदीची पावती घ्यावी, मुदतबाह्य भगर अथवा भगरीच्या पिठाची विक्री करू नये तसेच सुटी किंवा खुली भगर व भगर पीठ विक्रीसाठी ठेवू नये.

उपवासाच्या काळात सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थांचा वापर करून अन्न विषबाधेचा धोका टाळावा आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) पवनकुमार खताळ यांनी केले आहे.

*******

No comments: