• भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त जलजागृती कार्यशाळा व पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा अभ्यासदौरा
हिंगोली (जिमाका), दि. 16 : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखालील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या 55 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जलसाक्षरता, भूजल संवर्धन आणि पाणी गुणवत्तेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जलजागृती कार्यशाळा तसेच जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळा, हिंगोली येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
येथील श्रीमती शांताबाई मुंजाजी दराडे माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यशाळेत विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री. लोळेवार, माध्यमिक शिक्षक पंडित शिरसाठ, भूगोल विषयाचे शिक्षक श्री. गिराम तसेच शिक्षिका श्रीमती पानपट्टे यांनी विद्यार्थ्यांना जलसंवर्धन आणि पाणी गुणवत्तेचे महत्त्व समजावून सांगत कार्यक्रमास सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. बी. एन. संगणवार यांनी विद्यार्थ्यांना भूजलाचे वाढते महत्त्व, जलस्रोतांचे संवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन, भूजल पुनर्भरण आणि प्रत्येक नागरिकाची जलसंवर्धनातील जबाबदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी सहाय्यक भूवैज्ञानिक दीपक वाबळे यांनी "भूजलाचे स्त्रोत, भूजल पुनर्भरण आणि हिंगोली जिल्ह्याची भूजल परिस्थिती" या विषयावर माहितीपूर्ण सादरीकरण करून विद्यार्थ्यांना भूजल व्यवस्थापनाची माहिती दिली. तसेच जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेचे रसायणी प्रफुल्ल विणकरे यांनी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, पाणी तपासणीचे महत्त्व आणि दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सचिन भगत यांनी केले.
या कार्यशाळेनंतर 29 विद्यार्थ्यांनी जिल्हा पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेला अभ्यासदौरा केला. या अभ्यास दौऱ्यादरम्यान प्रफुल्ल विणकरे (रसायणी) आणि संतोष बेले (अणुजैविक तज्ज्ञ) यांनी प्रयोगशाळेतील अत्याधुनिक उपकरणे, पाणी गुणवत्ता तपासणीची वैज्ञानिक कार्यपद्धती, विविध रासायनिक व अणुजैविक चाचण्या तसेच दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांविषयी सविस्तर माहिती दिली. या उपक्रमासाठी सिद्धार्थ रणवीर, सचिन भगत आणि शिवशंकर भोयर यांनी सहकार्य केले.
यावेळी पाणी गुणवत्ता तपासणी प्रयोगशाळेच्या परिसरात अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रमेश रिठे, सय्यद आशपाक, अनिल सोळंके, राजेश राठोड, मनमथ व्यवहारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भूजल संवर्धन, जलसाक्षरता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केली.
****



No comments:
Post a Comment