10 July, 2026

ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजनेसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करा

 

·         पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन

 

हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक-कलाकार सन्मान योजना अंतर्गत कला व साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान दिलेल्या 100 ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना दरमहा 5 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी दि. 31 जुलै 2026 या कालावधीत 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, समता आणि सर्वसमावेशक विकासाच्या विचारांना अभिवादन करत आयुष्यभर कला व साहित्य क्षेत्रासाठी योगदान देणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलाकारांना आर्थिक आधार व सन्मान मिळावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. त्यांच्या योगदानाचा गौरव करून त्यांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी सहाय्य करणे, हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

योजनेसाठी अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. दिव्यांग कलाकारांसाठी वयोमर्यादेत 10 वर्षांची शिथिलता असून त्यांच्यासाठी किमान वय 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदाराचे कला अथवा साहित्य क्षेत्रातील किमान 15 वर्षांचे योगदान आवश्यक आहे. तसेच वयाने ज्येष्ठ असलेल्या विधवा, परित्यक्ता आणि दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 60 हजार रुपयांपेक्षा अधिक नसावे. उपजीविका प्रामुख्याने कलेवर अवलंबून असून, अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसलेल्या पात्र कलाकारांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र किंवा राज्य शासनाच्या नियमित मासिक पेन्शन अथवा कोणत्याही महामंडळाच्या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणारे अर्जदार या योजनेसाठी अपात्र राहतील. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

ऑनलाइन अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती-पत्नीचे संयुक्त छायाचित्र (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास), राज्य अथवा केंद्र शासनाचे संबंधित प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था किंवा व्यक्तींचे शिफारसपत्र (लागू असल्यास) तसेच आवश्यक अन्य कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

ही योजना सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांच्या कलासाधनेचा सन्मान करून त्यांना सामाजिक व आर्थिक बळ देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग विविध कल्याणकारी उपक्रम राबवत आहे.

पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी दि. 31 जुलै 2026 पूर्वी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

******

No comments: