27 July, 2026

कारगील वीरांचे बलिदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

कारगील विजय दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली; वीर पत्नी व वीर मातांचा सत्कार


हिंगोली (जिमाका), दि. 27 : कारगील युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कारगील युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांनी कारगील युद्धातील शहीद जवानांचे स्मरण करून त्यांच्या त्यागातून प्रत्येक भारतीयाला राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. तसेच उपस्थित माजी सैनिकांना शुभेच्छा देत त्यांच्या सेवाभावाचा गौरव केला.

या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी कारगील विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित करत देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक ऐक्य अबाधित राखण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असल्याचे सांगितले. तसेच माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सदैव तत्पर असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, सुभेदार मेजर पुंडगे भीमराव, बाबूराव जांबुतकर, पंडित हाके, आर. के. मांडगे, के. एम. जाधव, बाबूराव गाडे, भगवान चव्हाण यांच्यासह कारगील व इतर युद्धात वीरमरण आलेल्या सैनिकांच्या वीर पत्नी आणि वीर मातांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण संघटक कॅप्टन तुकाराम मुकाडे, खराटे संघपाल, कडुजी टापरे, सिताराम फुपाटे तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

****** 






No comments: