08 July, 2026

वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

• हरित महाराष्ट्रासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे


हिंगोली, दि. 8 (जिमाका) : जिल्ह्यात वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी सर्व विभागांनी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करून हरित महाराष्ट्राच्या उभारणीत सक्रिय योगदान द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड प्रभावीपणे राबविण्याच्या अनुषंगाने आयोजित दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) राजेश सरोदे, विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार तसेच विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

राज्य शासनाने 300 कोटी वृक्षारोपण मोहिमेसह विविध हरित उपक्रमांच्या नियोजन, अंमलबजावणी आणि संनियंत्रणासाठी 'हरित महाराष्ट्र आयोग' स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. सन 2026 ते 2047 या कालावधीत राज्यातील हरित आच्छादन वाढविण्याचा निर्धार शासनाने केला असून, त्यासाठी आवश्यक नियोजन, जागेची उपलब्धता, रोपे, मनुष्यबळ आणि विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.

हिंगोली जिल्ह्यास 7 लाख 98 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, आतापर्यंत झालेल्या वृक्ष लावगडीचा आढावा घेतला. सर्व विभागांनी आपापल्या वाट्याचे राहिलेले उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करून अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.

लागवड केलेल्या वृक्षांच्या दहा वर्षांच्या जतन व संवर्धनाची तरतूद करण्यात आली असून, त्यामुळे वृक्षांचे दीर्घकालीन अस्तित्व आणि वाढ सुनिश्चित होण्यास मदत होणार आहे. यामुळे राज्यातील हरित आच्छादनाची गुणवत्ता, शाश्वतता आणि पर्यावरणीय मूल्य वृद्धिंगत करण्याचे शासनाचे उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 33 टक्के क्षेत्र वनाच्छादित व वृक्षाच्छादित असणे अपेक्षित असून, हे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यातील 5 हजार 815 हेक्टर पोटखराब जमिनीवर वृक्षलागवडीचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 

सध्या विविध यंत्रणांकडे सुमारे 11 लाख रोपे उपलब्ध असून, त्यापैकी जास्तीत जास्त रोपे प्रथम ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्यावीत. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कृषी विभागास आवश्यकतेनुसार रोपांचे वितरण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

नदीकाठच्या पूरप्रवण गावांमध्ये पूरनियंत्रणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचे नियोजन करावे. तसेच 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गतही व्यापक जनसहभागातून वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

********

No comments: