हिंगोली, दि. ८(जिमाका): सहकार आयुक्त, महाराष्ट्र राज्य तथा निबंधक, सहकारी संस्था आणि दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांच्या संयुक्त विद्यमाने "आपली सूचना – सहकाराच्या नव्या वाटचालीचा पाया" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहकार सप्ताह २०२६ निमित्त राज्यातील नागरिक, शेतकरी, सभासद, युवक, महिला, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, अभ्यासक आणि तज्ज्ञ यांच्याकडून सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक, लोकाभिमुख व भविष्याभिमुख करण्यासाठी नाविन्यपूर्ण सूचना आणि कल्पना ३१ जुलै २०२६ पर्यंत मागविण्यात आल्या आहेत.
दि. २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या सहकार सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात उत्कृष्ट सूचनांना रोख पारितोषिके आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक २१ हजार १११, द्वितीय पारितोषिक १५ हजार ५५५, तृतीय पारितोषिक ११ हजार १११, चतुर्थ पारितोषिक ५ हजार ५५५ आणि पाचवे पारितोषिक हे २ हजार १११ रुपये किमतीचे असून, उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
इच्छुकांनी आपल्या सूचना दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांच्या संकेतस्थळावरील पर्यायाद्वारे किंवा msc.advisorycell@gmail.com या ई-मेलवर पाठवाव्यात, असे आवाहन सहकार आयुक्त तथा निबंधक, (सहकारी संस्था) दीपक तावरे आणि दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment