शासकीय कार्यालयांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार प्रशासनाची ओळख
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शाळा,
महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय,
जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय विभागांना प्रत्यक्ष भेट देण्याची
संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित विभागांचे अधिकारी विद्यार्थ्यांशी थेट
संवाद साधून कार्यालयीन कामकाजाची कार्यपद्धती, शासनाच्या विविध योजना, नागरिकांना
उपलब्ध असलेल्या सेवा तसेच प्रशासनातील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाबाबत सविस्तर
माहिती देणार आहेत.
'अमृत संवाद सेतू' उपक्रमाद्वारे
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जबाबदारीची जाणीव, संविधानिक मूल्यांबाबत
आदर, लोकशाही प्रक्रियेबाबत सकारात्मक दृष्टिकोन आणि सुजाण नागरिकत्वाची भावना
विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रशासनाशी थेट
संवाद साधून विविध विषयांवरील शंका मांडण्याची व त्यांचे निरसन करून घेण्याची
संधीही उपलब्ध होणार आहे.
विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात
प्रभावी संवाद निर्माण करून परस्पर विश्वास अधिक दृढ करण्यासाठी हा उपक्रम
महत्त्वपूर्ण ठरणार असून, भविष्यात जबाबदार, जागरूक आणि राष्ट्रहिताची जाणीव
असलेले नागरिक घडविण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास महाराष्ट्र संशोधन,
उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांनी व्यक्त केला आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांनी अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली (मो. 7391065471) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*******

No comments:
Post a Comment