13 July, 2026

बुधवारी हिंगोलीत भव्य रोजगार मेळावा * महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



 

·         20 हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग; 2 हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी

 

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक आणि युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. 15 जुलै 2026 रोजी हिंगोली येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अध्यक्ष आणि सचिव यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी विपुल भागवत तसेच कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील 20 हून अधिक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या सहभागी होणार असून, विविध पदांसाठी 2 हजारांहून अधिक रिक्त पदे उपलब्ध असतील. दहावी, बारावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, सर्व शाखांतील पदवीधर, सीएनसी ऑपरेटर, सिपेट तसेच इतर पात्र उमेदवारांसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

उमेदवारांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे असून, निवड झालेल्या उमेदवारांना साधारणतः 15 हजार ते 30 हजार रुपये मासिक वेतन अथवा विद्यावेतन मिळण्याची संधी आहे. तसेच संबंधित कंपन्यांकडून जेवण, चहा-नाश्ता, बस सुविधा, आठ तासांची ड्युटी तसेच ओव्हरटाईमची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हा रोजगार मेळावा कै. शिवाजीराव देशमुख सभागृह, रामलीला मैदानाशेजारी, हिंगोली  येथे बुधवार, दि. 15 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व युवक-युवतींनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून त्वरित नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी महाविद्यालयांनी गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एम्स, नीट, आयआयटी, सीए आदी स्पर्धात्मक अभ्यासक्रमांसाठी विशेष मार्गदर्शन व लक्ष्याधारित उपक्रम राबविण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येक महाविद्यालयातून किमान एक विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी निवडला जाईल, यासाठी प्रयत्न करावेत. तसेच प्रत्येक महाविद्यालयातून तीन गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

********

No comments: