हिंगोली (जिमाका), दि. 9 : हिंगोली
जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले असून, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून
प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता 4.6 रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात
आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू वसमत तालुका परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती प्राप्त
झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा पसरवू नयेत तसेच अफवांना बळी पडू
नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 3 वाजेनंतर
भूकंपाचे धक्के जाणवले असून, भूकंपासंदर्भातील
कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर अथवा समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास
ठेवू नये. अधिकृत माहिती केवळ जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि शासनाच्या
अधिकृत माध्यमांतूनच प्राप्त करावी. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य
करावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती अथवा नुकसान आढळल्यास तत्काळ स्थानिक प्रशासन
किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.
गुप्ता यांनी केले आहे.
तसेच, समाजात भीतीचे वातावरण
निर्माण होईल अशा प्रकारच्या अफवा किंवा दिशाभूल करणारे संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित
करणे अथवा पुढे पाठविणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment