·
ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित
हिंगोली (जिमाका), दि. 9 : कळमनुरी तालुक्यातील मौजे पिंप्री बु., कृष्णापूर
आणि येगाव येथील बाधित शेतकऱ्यांना शेतखरडणी अनुदान वितरणात अनियमितता झाल्याप्रकरणी
संबंधित सहायक कृषी अधिकारी श्री. एस. एस. संगमवार यांच्याविरुद्ध प्रथम माहिती अहवाल
(एफआयआर) दाखल करण्यात आला असून, संबंधित ग्राम महसूल अधिकारी श्री. एकनाथ कदम यांच्याविरुद्ध
विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.
तहसीलदार, कळमनुरी यांनी सादर केलेल्या
अहवालानुसार, शेतखरडणी अनुदान वितरणासाठी तयार करण्यात आलेल्या लाभार्थी यादीत सातबारा
उताऱ्यावर नावे नसलेल्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. तसेच
काही लाभार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र दाखवून अतिरिक्त अनुदान
वितरित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणात संबंधित सहायक कृषी अधिकारी
श्री. एस. एस. संगमवार यांनी शासकीय कामकाजात कसूर केल्याचे
निष्पन्न झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या जबाबदारीची निश्चिती
करून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस तहसीलदार, कळमनुरी यांनी केली
होती.
त्यानुसार संबंधित सहायक कृषी अधिकारी
एस. एस. संगमवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी तहसीलदार, कळमनुरी यांना प्राधिकृत
करण्यात आले होते. त्या अनुषंगाने तहसीलदारांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध प्रथम
माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केला आहे.
याशिवाय या प्रकरणातील संबंधित ग्राम
महसूल अधिकारी (बाळापूर सज्जा) एकनाथ कदम यांच्याविरुद्धही विभागीय
चौकशी प्रस्तावित करण्यात आली असून, नियमानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात
येणार आहे.
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता
व उत्तरदायित्व राखण्यासाठी अनियमितता करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार
कठोर कारवाई करण्यात येईल, असा प्रशासनाने इशारा दिला आहे.
********
No comments:
Post a Comment