• हिंगोलीत आयुक्त संजय काटकर यांचा चार जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणेचा सखोल आढावा
• आरबीएसके, टीबीमुक्त भारत, एचपीव्ही लसीकरण आणि एनकॉसवर भर
जिल्हा परिषदेच्या सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, चारही जिल्ह्यांचे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा लेखा व्यवस्थापक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत कार्यरत पथकांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला. शाळा व अंगणवाड्यांमधील सर्व बालकांची आरोग्य तपासणी 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त संजय काटकर यांनी दिले. तसेच आरबीएसके पथकांनी भेट दिलेल्या गावांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी बैठकीतूनच आरोग्य तपासणी झालेल्या बालकांच्या पालकांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून आरोग्य सेवेची प्रत्यक्ष पडताळणी केली.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचा आढावा घेताना त्यांनी 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत टीबी तपासणी अभियान अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले. संशयित रुग्णांचा शोध आणि निदान प्रक्रिया गतीमान करण्यासाठी आवश्यक हँडहेल्ड एक्स-रे व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी नियमितपणे आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन त्यांचे निरीक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीत राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) कार्यक्रमाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. पात्र आरोग्य संस्थांची राज्यस्तरीय परीक्षकांकडून तपासणी करून प्रत्येक संस्थेसाठी 12 महिन्यांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जिल्ह्यातील पात्र सर्व आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्राप्त करून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यावर आयुक्तांनी विशेष भर दिला.
यावेळी राष्ट्रीय माता-बाल संगोपन कार्यक्रम तसेच एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा आढावाही घेण्यात आला. शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षण विभागाशी समन्वय साधून पात्र मुलींचे 100 टक्के लसीकरण निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय पदनिर्मिती, रिक्त पदांची भरती, आयुष्मान भारत डिजिटल मिशनची अंमलबजावणी तसेच विविध आरोग्य संस्थांच्या सुरू असलेल्या बांधकामांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त संजय काटकर म्हणाले की, आरोग्य सेवा केवळ उपचारांपुरती मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक, सर्वसमावेशक आणि नागरिकांच्या अपेक्षांना प्रतिसाद देणारी असावी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयाने दर्जेदार सेवा, वेळेवर उपचार आणि रुग्णांचे समाधान यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे.
यावेळी बोलताना श्री. काटकर म्हणाले की, "आरोग्य व्यवस्थेत प्रभावी संवादाला अत्यंत महत्त्व आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयीन कामकाजापुरते मर्यादित न राहता नियमित क्षेत्रभेटी घ्याव्यात, आरोग्य संस्थांचे निरीक्षण करावे, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करावे आणि नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवावा. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, सुयोग्य नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वय यामुळेच आरोग्य सेवा अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि लोकाभिमुख होऊ शकते," असेही त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेऊन प्रलंबित बाबी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन आयुक्त संजय काटकर यांनी केले.
******
.jpeg)
.jpeg)

No comments:
Post a Comment