·
15 जुलै ते 14 ऑगस्टदरम्यान अर्ज स्वीकारणार;
ग्रामपंचायत, महिला बचत गट व सहकारी संस्थांना प्राधान्य
हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्ह्यातील नागरिकांना सार्वजनिक वितरण
प्रणालीच्या माध्यमातून अन्नधान्याचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्याच्या
उद्देशाने हिंगोली जिल्ह्यातील 68 रिक्त गावांसाठी रास्त भाव
दुकान परवाने मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या
अनुषंगाने जिल्हा पुरवठा विभागामार्फत सार्वजनिक प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले
असून, पात्र संस्था व संघटनांकडून 15 जुलै 2026 ते 14 ऑगस्ट 2026
या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या दि.
6 जुलै 2017 च्या शासन निर्णयामधील
मार्गदर्शक सूचनांनुसार ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील हिंगोली,
वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या पाचही तालुक्यांतील
रिक्त गावांची यादी संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस पाटील कार्यालय, तलाठी
कार्यालय, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना
फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
रास्त भाव दुकान परवाना मंजूर
करताना शासनाने निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार पात्र अर्जदारांची निवड केली
जाणार आहे. यामध्ये ग्रामपंचायती, नोंदणीकृत सहकारी संस्था, महिला
बचत गट, स्वयं-सहाय्यता बचत गट, महिला संस्था तसेच शासनाने पात्र ठरविलेल्या अन्य
संस्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात महिलांचे
आर्थिक सक्षमीकरण आणि सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने
महिला संस्थांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
इच्छुक अर्जदारांनी आवश्यक
कागदपत्रांसह विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तहसील कार्यालयात सादर करावेत.
अर्जासोबत शासनाने नमूद केलेली सर्व आवश्यक प्रमाणपत्रे जोडणे बंधनकारक असून, अपूर्ण,
त्रुटीपूर्ण किंवा मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
प्राप्त अर्जांची शासनाच्या
निकषांनुसार छाननी करण्यात येईल. त्यानंतर पात्र अर्जदारांची निवड करून संबंधित
गावांसाठी रास्त भाव दुकान परवाने मंजूर करण्यात येणार आहेत. आवश्यकतेनुसार
प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत बदल करण्याचा अथवा कोणतेही कारण न देता
प्रक्रिया स्थगित अथवा रद्द करण्याचा अधिकार प्रशासनाकडे राखून ठेवण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा विभागाने प्रसिद्ध
केलेल्या यादीनुसार एकूण 68 रिक्त गावांमध्ये
रास्त भाव दुकाने सुरू होणार असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय
अन्नधान्य वितरण अधिक सुलभ, पारदर्शक व वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे पात्र संस्था व संघटनांनी मुदतीत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा,
असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, हिंगोली यांनी
केले आहे.
No comments:
Post a Comment