हिंगोली (जिमाका), दि. 14 : शेतकऱ्यांना त्यांच्या परिसरातच शेतमालाची
खरेदी-विक्री करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हिंगोली कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात सिरसम बु. (ता. जि. हिंगोली) येथे उपबाजार आवार (सब
मार्केट यार्ड) सुरू करण्याबाबतची अधिसूचना जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
हिंगोली यांनी जारी केली आहे. ही अधिसूचना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री
(विकास व विनियमन) अधिनियम, 1963 मधील तरतुदींनुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यापूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती,
सिरसम बु. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली यांचे एकत्रीकरण करण्यात आले
असून, नव्याने स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोलीच्या
कार्यक्षेत्रात सिरसम बु. येथे उपबाजार आवार स्थापन करण्याचा निर्णय प्रशासकीय
समितीने घेतला होता. त्यानुसार आवश्यक प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर
करण्यात आला होता.
या अधिसूचनेनुसार सिरसम
बु. येथील सुमारे 5 एकर (2 हेक्टर 2 आर) जागेवर उपबाजार आवार कार्यान्वित करण्यात
येणार असून येथे शेतमाल व फळभाजीपाला या अधिसूचित कृषी उत्पन्नाची खरेदी-विक्री
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, 1963 व संबंधित
नियमांनुसार नियमित करण्यात येईल.
राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध
झाल्याच्या तारखेपासून सिरसम बु. येथील उपबाजार आवार कृषी उत्पन्न बाजार समिती,
हिंगोलीच्या बाजार क्षेत्राच्या अधिकारात येणार असून, त्यामुळे परिसरातील
शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी जवळच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच कृषी
मालाच्या विक्री प्रक्रियेत पारदर्शकता, सुलभता आणि बाजार व्यवस्थापनाला चालना
मिळणार आहे.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
हिंगोली यांनी संबंधित अधिसूचनेची व्यापक प्रसिद्धी करून शेतकरी, व्यापारी व सर्व
संबंधितांना याची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
******
No comments:
Post a Comment