27 July, 2026

नैसर्गिक शेतीचा स्वीकार काळाची गरज आत्मा योजनेअंतर्गत कंजारा येथे नैसर्गिक शेती शाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 


हिंगोली (जिमाका), दि. 27 : कृषी विभागाच्या आत्मा योजनेअंतर्गत औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे कंजारा येथे नैसर्गिक शेती शाळेचे आयोजन करण्यात आले. या शेती शाळेत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीतील विविध तंत्रज्ञान, जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर तसेच जैविक पद्धतीने कीड व रोग व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक के. एस. घुगे, सेंद्रिय शेती तज्ज्ञ मार्गदर्शक डी. एन. गुंठे उपस्थित होते. त्यांनी नैसर्गिक शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होण्याबरोबरच जमिनीचे आरोग्य सुधारते, पर्यावरणाचे संवर्धन होते आणि सुरक्षित अन्न उत्पादनास चालना मिळते, असे सांगितले. तसेच जैविक निविष्ठा स्वतः तयार करून त्यांचा प्रभावी वापर करण्याचे आणि रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक उपायांचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले.

या कार्यक्रमासाठी आयोजक शेतकरी शंकरराव कल्याणकर, गजाननराव कल्याणकर, रामराव कल्याणकर तसेच परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीबाबत विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.

आत्मा योजनेअंतर्गत अशा प्रकारच्या नैसर्गिक शेती शाळांमुळे शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार होऊन पर्यावरणपूरक व खर्चात बचत करणाऱ्या शेतीला चालना मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

***

No comments: