जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीची बैठक संपन्न
*हिंगोली, दि. २२ (जिमाका) :* जिल्ह्यातील गौण खनिज वाळूच्या उत्खनन, वाहतूक व साठवणुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून अनधिकृत वाळू उपसा, वाहतूक व साठवणुकीविरुद्ध सातत्याने संयुक्त कारवाई करावी. महसूल, पोलीस, परिवहन, गौण खनिज व संबंधित विभागांनी नियमित तपासण्या करून शासनाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
जिल्हा खनिकर्म अधिकारी अश्विन माने, पोलीस उपअधीक्षक पी. एम. माकोडे, सहायक वनसंरक्षक एस. आर. माने, सहायक भूवैज्ञानिक डी.एन. बावळे, सहायक कार्यकारी अभियंता (लघुपाटबंधारे विभाग) डी. एस. येस्के, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील वाळू घाटांची सद्यस्थिती, अनधिकृत वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाया, जप्तीची प्रकरणे, महसूल व दंडवसुली, संवेदनशील भागांतील देखरेख, तसेच विविध विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी अनधिकृत वाळू उपशास प्रतिबंध करण्यासाठी संयुक्त तपासणी पथके अधिक सक्रिय ठेवण्याच्या, रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याच्या, तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याच्या तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या. नदीपात्रातील पर्यावरणीय समतोल अबाधित राहील याची दक्षता घेण्याबरोबरच शासनाच्या धोरणानुसार वाळू व्यवस्थापनाची पारदर्शक व प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
******

No comments:
Post a Comment