हिंगोली (जिमाका), दि. 31 : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रस्तावित विविध विकास कामांचे अंदाजपत्रक तात्काळ तयार करून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत. तसेच प्रत्येक कामाचे यूआयडी क्रमांकासह प्रस्ताव 10 ऑगस्टपर्यंत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
लोकप्रतिनिधींनी प्रस्तावित केलेल्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याच्या अनुषंगाने संबंधित विभागांनी कार्यवाही गतिमान करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले. यामध्ये शाळा वर्गखोली बांधकाम, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकाम तसेच दुरुस्ती, अंगणवाडी बांधकाम, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा रस्त्यांचा विकास व मजबुतीकरण, तीर्थक्षेत्र विकास, दलित वस्ती विकास, जलसंधारण, शाळा क्रीडांगण विकास यासह विविध कामांचा समावेश आहे.
या सर्व कामांचे अंदाजपत्रक यूआयडी क्रमांकासह तयार करून प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव विहित मुदतीत सादर करावेत. तसेच दायित्वाच्या कामांचे प्रस्तावही तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
अमृत वृक्ष योजनेत हिंगोली जिल्ह्याचे उद्दिष्ट 11 लाख
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या वृक्ष लागवड मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेली वृक्ष लागवड तसेच आगामी काळात करावयाच्या वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाचा त्यांनी विभागनिहाय आढावा घेतला.
हिंगोली जिल्ह्यासाठी यापूर्वी 7 लाख 98 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. अमृत वृक्ष योजनेंतर्गत हे उद्दिष्ट वाढवून 11 लाख करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 48 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
उर्वरित उद्दिष्टानुसार संबंधित विभागांनी नियोजनबद्ध पद्धतीने वृक्ष लागवड पूर्ण करावी तसेच लागवड केलेल्या वृक्षांची माहिती ‘अमृत वृक्ष’ ॲपवर अद्ययावत करावी. वृक्ष लागवड मोहिमेत हिंगोली जिल्ह्याला आघाडीवर आणण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रभावीपणे काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
******

No comments:
Post a Comment