31 July, 2026

माजी सैनिक व वन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी 181 पदांची भरती

 


हिंगोली (जिमाका), दि. 31 : सशस्त्र दलातील  भूतपूर्व सैनिक तसेच वने व हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील किमान 20 वर्षे सेवा केलेल्या भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महार येथे विविध पदांची भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 181 रिक्त पदे उपलब्ध असून, महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील पात्र उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

या भरती मेळाव्याचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिला टप्पा कोल्हापूर येथील 109 इन्फंट्री बटालियन (टीए) मराठा एलआय येथे दि. 1 ते 4 सप्टेंबर 2026 दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून, तर दुसरा टप्पा छत्रपती संभाजीनगर येथील एआरओ प्रांगणात दि. 8 ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान सकाळी 5 वाजल्यापासून होणार आहे.

भरतीमध्ये जेसीओची 4 पदे, सोल्जर (जीडी)ची 162 पदे आणि ट्रेड्समनची 15 पदे आहेत. सोल्जर (जीडी) पदांसाठी केवळ महाराष्ट्रातील उमेदवार पात्र असतील. ट्रेड्समन पदांमध्ये सोल क्लार्क (जीडी)-7, हेअर ड्रेसर-1, मेस कीपर-1, स्टिवर्ड-1, हाऊस कीपर-1, शेफ कम्युनिटी-2 आणि वॉशरमन-2 पदांचा समावेश आहे. या पदांसाठी संपूर्ण भारतातील उमेदवार पात्र आहेत.


पात्रता व सेवा अटी


उमेदवार हा सशस्त्र दलातील भूतपूर्व सैनिक (निवृत्तिवेतनधारक) किंवा वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागात किमान 20 वर्षे सेवा केलेला भूतपूर्व महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे. वयोमर्यादेची किमान अट नाही. मात्र, सेवानिवृत्ती अथवा सेवामुक्तीच्या तारखेपासून भरतीच्या तारखेपर्यंत पाच वर्षांच्या आत नोंदणी झालेली असणे आवश्यक आहे.

उमेदवाराची वैद्यकीय श्रेणी शेष-1 आणि चारित्र्य अनुकरणीय अथवा अतिशय चांगले असावे. उमेदवार कोणत्याही दिवाणी अथवा फौजदारी प्रकरणात सहभागी नसावा. निवड झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागणार आहे.


शारीरिक पात्रता


भूतपूर्व सैनिकांसाठी उंची 160 सेंमी, तर गोरखा, गढवाली व आसामी उमेदवारांसाठी 152 सेंमी उंची आवश्यक आहे. वने व हवामान बदल मंत्रालय तसेच राज्य वन विभागातील भूतपूर्व महिला कर्मचाऱ्यांसाठी उंची 150 सेंमी आवश्यक आहे.

वजन माजी सैनिकांसाठी किमान 50 किलो, तर महिला कर्मचाऱ्यांसाठी किमान 42 किलो असावे. माजी सैनिकांसाठी छाती 82 सेंमी व किमान 5 सेंमी विस्तार आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांची छाती किमान 5 सेंमी विस्तारण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.


निवड प्रक्रिया


सैनिकांसाठी प्रारंभिक कागदपत्र तपासणी, 1 मैल धाव, 9 फूट खंदक, पुलअप्स, बॅलन्स बीम, बीओओमार्फत मुलाखत व वैद्यकीय तपासणी अशी प्रक्रिया राहणार आहे. वने व हवामान बदल मंत्रालय व राज्य वन विभागातील महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रारंभिक कागदपत्रे तपासणी, बीओओमार्फत मुलाखत, संबंधित कामातील प्रावीण्य चाचणी व वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.


आवश्यक कागदपत्रे


उमेदवारांनी मूळ निवृत्तिवेतन आदेश (पीपीओ), मूळ डिस्चार्ज बुक व स्वयं-साक्षांकित प्रत, मूळ अधिवास प्रमाणपत्र, सैनिक ओळखपत्र, आधार कार्ड व स्वयं-साक्षांकित प्रत, अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराची 10 छायाचित्रे तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

ही भरती गुणवत्ता व रिक्त पदांच्या आधारे केली जाणार आहे. इको टीए मधील सेवा निवृत्तिवेतनास पात्र नसलेली आहे. उमेदवाराची सुरुवातीला दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात येईल. कामगिरीच्या आधारे एक वर्षाची मुदतवाढ दिली जाऊ शकते. सैनिक जेसीओंना वयाच्या 55 वर्षांपर्यंत, तर भूतपूर्व सैनिक शिपायांना 50 वर्षांपर्यंत सेवा करता येईल. सैनिकांचे सध्याचे निवृत्तिवेतन अबाधित राहणार आहे.


महत्त्वाच्या सूचना


या भरती मेळाव्यादरम्यान मोबाईल फोनला परवानगी राहणार नाही. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य व निष्पक्ष असून उमेदवारांनी कोणालाही लाच देऊ नये तसेच दलालांपासून सावध राहावे. खोटी अथवा बनावट कागदपत्रे सादर केल्यास उमेदवारी रद्द करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नमूद केलेल्या ठिकाणी, दिनांक व वेळेत उपस्थित न राहणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

भरतीबाबत चौकशी अथवा स्पष्टीकरणासाठी 9168168136 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

******

No comments: