25 July, 2026

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात 100 टक्के काम पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार





हिंगोली (जिमाका), दि. 25 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यात दि. 30 जून 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदार पडताळणी मोहीम सुरू असून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घराघरात जाऊन मतदारांची पडताळणी करीत आहेत. या मोहिमेत संपूर्ण जिल्ह्यात 1,015 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी कार्यरत असून त्यांना सहाय्य करण्यासाठी 37 सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या अभियानांतर्गत मतदारांना गणना प्रपत्रांचे वितरण, प्रपत्रे पूर्ण करून घेणे तसेच प्राप्त माहितीचे संगणकीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व कामांमध्ये 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विभागीय आयुक्त हे विभागातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण कार्यक्रमाच्या आढाव्यासाठी हिंगोली दौऱ्यावर आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चौंडेकर, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी राजेश सरवदे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सत्कार करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमध्ये एस. एस. कंदी, देवेंद्र डोल्हारे, रवी गायकवाड, एस. एन. नवले आणि देवानंद जावळे यांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी गणना प्रपत्रांचे 100 टक्के वितरण, 100 टक्के डिजिटायझेशन आणि विहित कालावधीत काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

जिल्ह्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी आणि संबंधित यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

*******

No comments: