15 July, 2026

'भारत कौशल्य स्पर्धे'त सहभागी होण्याची सुवर्णसंधी



23 वर्षांखालील युवक-युवतींनी कौशल्य स्पर्धेत सहभागी  होण्याचे आवाहन


हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्ह्यातील युवक-युवतींना आपल्या कौशल्याचा ठसा राष्ट्रीय स्तरावर उमटविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत कौशल्य स्पर्धा 2026-27 अंतर्गत जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, पात्र युवक-युवतींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी केले आहे.

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक कौशल्य स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारत कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. सन 2026-27 मधील स्पर्धेच्या अनुषंगाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध सेक्टर स्किल कौन्सिल तसेच औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून निवड झालेल्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी नामांकनाची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेत 63 हून अधिक आधुनिक व पारंपरिक कौशल्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रगत तंत्रज्ञान विभागांतर्गत रोबोटिक्स, थ्री-डी डिजिटल गेम आर्ट, सायबर सुरक्षा, आयटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्स; अभियांत्रिकी व उत्पादन विभागात वेल्डिंग, सीएनसी टर्निंग, मेकॅट्रॉनिक्स, फाउंड्री व फॅब्रिकेशन; सर्जनशील कला व फॅशन विभागात फॅशन टेक्नॉलॉजी, ग्राफिक डिझाइन, हेअरड्रेसिंग, व्हिज्युअल मर्चेंडायझिंग; तसेच सेवा क्षेत्रात बेकरी, हॉटेल रिसेप्शन आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी यांसारख्या विविध कौशल्यांचा समावेश आहे.

या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा प्रमुख पात्रता निकष असून, उमेदवाराचा जन्म 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. काही कौशल्य प्रकारांसाठी स्वतंत्र वयोमर्यादा लागू राहणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, औद्योगिक आस्थापना तसेच उद्योगांनी आपल्या विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांना या स्पर्धेबाबत माहिती देऊन त्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कौशल्याला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, हिंगोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक 02456-224574 वर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

***

No comments: