• अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांसाठी राज्यस्तरीय पीकस्पर्धा; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे
हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, उत्पादकतेत वाढ आणि प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2026-27 साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची राज्यस्तरीय पीकस्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
यापूर्वी पीकस्पर्धेची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविण्यात येत होती. मात्र, प्रशासनात पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी खरीप हंगाम 2026 पासून स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुका, जिल्हा आणि राज्य या तीन स्तरांवर स्पर्धा होणार असून, सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांमधून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण 11 पिकांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधित जमीन शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. एका शेतकऱ्यास एकाच वेळी एका पिकासाठीच स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. भात पिकासाठी किमान 20 गुंठे, तर इतर पिकांसाठी किमान 40 गुंठे सलग लागवड क्षेत्र असणे आवश्यक आहे.
अर्जासोबत फार्मर आयडी, प्रवेश शुल्क भरल्याची पावती, आवश्यकतेनुसार जात प्रमाणपत्र तसेच बँक खाते किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत जोडणे आवश्यक आहे. मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026, तर भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल पिकांसाठी 31 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये ठेवण्यात आले आहे. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्यास अनुक्रमे 5 हजार, 10 हजार व 50 हजार रुपये तर द्वितीय येणाऱ्यास 3 हजार, 7 हजार व 40 हजार रुपये तर तृतीय येणाऱ्यास 2 हजार, 5 हजार आणि 30 हजार रुपये याप्रमाणे रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील "पीक स्पर्धा नोंदणी" टॅबद्वारे ऑनलाइन अर्ज करून या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
***
No comments:
Post a Comment