हिंगोली (जिमाका), दि. 30 : प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग व उडीद या पिकांसाठी शेतकऱ्यांना पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2026 आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी पीकविमा योजनेत सहभागी होऊन आपल्या पिकांना विमा संरक्षण द्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
खरीप हंगाम 2026-27 साठी प्रधानमंत्री पीकविमा योजना जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि उडीद या पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे एग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक (फार्मर आयडी) असणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत कापूस पिकासाठी प्रति हेक्टर 69 हजार रुपये, सोयाबीनसाठी 62 हजार 500 रुपये, तुरीसाठी 47 हजार रुपये, मुगासाठी 30 हजार रुपये आणि उडदासाठी 27 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी संबंधित बँक, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) किंवा राष्ट्रीय पीकविमा पोर्टलच्या माध्यमातून विहित मुदतीत अर्ज करावा. शेतकऱ्यांनी पीकविमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. सीएससी चालकांना विमा कंपनीकडून प्रति अर्ज 40 रुपये मानधन देण्यात येते.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी किमान 0.10 हेक्टर क्षेत्रावर संबंधित पिकाची लागवड केलेली असणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेमार्फत, तर बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँक अथवा सीएससीच्या माध्यमातून योजनेत सहभागी व्हावे.
पीकविमा योजनेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच शेतकऱ्यांसाठी 14447 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची प्रतीक्षा न करता दि. 31 जुलै 2026 पूर्वी पीकविमा काढून घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
******
No comments:
Post a Comment