• 385 नमुन्यांपैकी 34 नमुने अप्रमाणित; सात प्रकरणांमध्ये न्यायालयीन कारवाई, 175 बॅग बियाण्यांच्या विक्रीस स्थगिती
हिंगोली (जिमाका), दि. 15 : हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावीत तसेच निकृष्ट बियाण्यांची विक्री रोखण्यासाठी कृषी विभागाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या सूचनेनुसार कृषी विभागामार्फत बियाण्यांच्या नमुन्यांची सातत्याने तपासणी, तक्रारींचे निवारण आणि दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
कृषी विभागामार्फत मे महिन्यापासून आतापर्यंत विविध बियाणे उत्पादक कंपन्यांच्या 385 बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये मे महिन्यात 34, जूनमध्ये 339 आणि जुलै महिन्यात 12 नमुने घेण्यात आले आहेत.
या नमुन्यांपैकी आतापर्यंत 34 नमुने अप्रमाणित (फेल) आढळले आहेत. विविध बियाणे उत्पादक कंपन्यांच्या वेगवेगळ्या बॅचमधील हे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी सात प्रकरणांमध्ये न्यायालयीन खटले दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित 27 प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पीक असून आतापर्यंत 2 लाख 41 हजार 813 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणीनंतर शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या 16 तक्रारींपैकी 11 तक्रारींची तालुका तक्रार निवारण समितीमार्फत प्रत्यक्ष शेतपातळीवर तपासणी करून निकाल देण्यात आला आहे. उर्वरित तक्रारींवरही कार्यवाही सुरू आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बियाणे विक्रेत्यांवरही कृषी विभागाने कारवाई केली असून 175 बॅग बियाण्यांच्या विक्रीस 'स्टॉप सेल' आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात बियाण्यांच्या गुणवत्ता, साठा आणि विक्रीवर नियमित देखरेख ठेवण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी बियाण्यांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडूनच करावी, खरेदीची पावती जतन करून ठेवावी आणि निकृष्ट बियाण्यांबाबत कोणतीही तक्रार असल्यास तत्काळ संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
**
No comments:
Post a Comment