15 July, 2026

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फेसलेस सेवांचा नागरिकांनी लाभ घ्यावा


लायसन्स व वाहन नोंदणीसाठी 58 सेवा पूर्णपणे ऑनलाइन; अनधिकृत व्यक्तींपासून सावध राहण्याचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. 15 : हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी वाहन परवाना (लायसन्स) व वाहन नोंदणीसंदर्भातील विविध कामांसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) फेसलेस ऑनलाइन सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी केले आहे.

परिवहन विभागाने नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ आणि वेळेची बचत करणाऱ्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वाहन 4.0 ही संगणकीय प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीद्वारे लायसन्स व वाहन नोंदणीसंदर्भातील विविध अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येतात. यामुळे नागरिकांना कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यकता कमी झाली असून सेवा अधिक जलद व सोयीस्कर झाल्या आहेत. 

या फेसलेस सेवांमध्ये अर्जदाराने आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे प्रमाणीकरण केल्यानंतर घरबसल्या अर्ज सादर करता येतो. अर्जाची कार्यालयाकडून पडताळणी करून नियमानुसार मंजुरी अथवा पुढील कार्यवाही केली जाते. त्यामुळे अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थांच्या माध्यमातून काम करून घेण्याची आवश्यकता राहत नाही.  

परिवहन विभागामार्फत उपलब्ध असलेल्या 115 अधिसूचित सेवांपैकी 89 सेवा ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यापैकी 58 सेवा पूर्णपणे फेसलेस पद्धतीने नागरिकांना दिल्या जात आहेत. वाहन व सारथी पोर्टलच्या माध्यमातून या सेवांचा लाभ सहजपणे घेता येतो. 

या प्रणालीमध्ये आवश्यक शासकीय शुल्क व कराची रक्कमही ऑनलाइन भरता येत असल्याने व्यवहार अधिक पारदर्शक झाले आहेत. कोणत्याही अनधिकृत व्यक्तीकडून अतिरिक्त शुल्काची मागणी झाल्यास किंवा फसवणुकीचा संशय आल्यास नागरिकांनी तात्काळ उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच कार्यालयात माहिती व मदत कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

****

No comments: