* हिंगोलीत विविध उपक्रमांनी ‘वनमहोत्सव २०२६’ उत्साहात
* वृक्षपूजन, वृक्षारोपण व रोप विक्री केंद्राच्या उद्घाटनातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
हिंगोली, दि. २२ (जिमाका) : वृक्षारोपण ही केवळ एक मोहीम नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याची सामूहिक जबाबदारी आहे. ही सामूहिक जबाबदारी सर्वांनी पार पाडावी. त्यामुळे जिल्हा हरित व पर्यावरणीयदृष्ट्या संपन्न होईल. ही पर्यावरणीय संपन्नता आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
सामाजिक वनीकरण विभाग तथा राज्य राखीव पोलिस बल गट क्र. १२, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वनमहोत्सव २०२६’ विविध पर्यावरणपूरक उपक्रमांसह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. वृक्षपूजन, वृक्षारोपण, रोप विक्री केंद्राचे उद्घाटन आणि जनजागृतीपर उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश यावेळी देण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १२ चे समादेशक सुशांत सिंह, सहायक समादेशक एस. एच. पवार, सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार, सहायक वनसंरक्षक विजय कटके तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी संदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात ‘एक पेड मॉ के नाम’ या उपक्रमामध्ये जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण व पूजनाने करण्यात आली. ‘हरित हिंगोली’च्या संकल्पनेला बळ देण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नागरिकांना दर्जेदार रोपे सहज उपलब्ध व्हावीत, यासाठी रोप विक्री केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल संदीप वाघ तसेच वनरक्षक देवराव दिपके, बालाजी जाधव, सूरज शेळके, सुनिता लोणे आणि राजू कोटकर यांनी विशेष परिश्रम घेतले. एसआरपीएफच्या वतीने अतुल अवरगंड, तुषार भालेराव, शाहू भालेराव तसेच इतर अधिकारी-कर्मचारी यांनीही नियोजनात सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****




No comments:
Post a Comment