हिंगोली (जिमाका), दि. 31 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त कळमनुरी येथील केसरीनंदन मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अंदाजे 4 हजार 500 लाभार्थी उपस्थित होते.
या शिबिरास आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, माजी आमदार गजानन घुगे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भूते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, सेवा व सुविधांची माहिती देण्याबरोबरच पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण करण्यात आले.
यावेळी जिवंत सातबारा उतारे 1 हजार 151, वाटणीपत्रावरील नोंदणी फीमध्ये सवलत/लाभ 131, पाणंद रस्ते 19, अतिक्रमण नियमानुकूल अर्ज 386, घरकुल लाभार्थी 73, राज्यस्तरीय योजनांचे लाभ 5 हजार 608, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शासकीय योजनांचे लाभ 20 आणि बसच्या मोफत पासचे वाटप 125 असे एकूण 7 हजार 513 लाभांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविणे, नागरिकांच्या विविध प्रशासकीय अडचणींचे निराकरण करणे आणि महसूल विभागाच्या सेवा सुलभ व गतिमान पद्धतीने उपलब्ध करून देणे, हा या समाधान शिबिराचा प्रमुख उद्देश होता. विविध विभागांच्या स्टॉलला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन योजनांची माहिती घेतली.
यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव तसेच माजी आमदार गजानन घुगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिरास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******


No comments:
Post a Comment