ग्रामीण भागात सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 17 : जलजीवन मिशन
अंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध नळ पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित
कालावधीत पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध, सुरक्षित व नियमित
पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी
संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन मिशन
अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा सविस्तर प्रगती आढावा
घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक
गायकवाड, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी
दिवाणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, संबंधित विभागांचे
अधिकारी, जलजीवन मिशनचे अभियंते तसेच विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीत
जिल्ह्यातील विविध नळ पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, तांत्रिक
अडचणी तसेच योजनांच्या कार्यान्वयनाचा सखोल आढावा घेण्यात आला. अंतिम टप्प्यात
असलेल्या योजनांची कामे गतीने पूर्ण करून ग्रामीण नागरिकांना सुरक्षित पिण्याच्या
पाण्याचा लाभ मिळेल, यावर विशेष भर देण्यात आला.
महाराष्ट्र जीवन
प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या डोंगरकडा, आरळ तसेच इतर पाणीपुरवठा
योजनांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. याशिवाय पानकनेरगाव, जवळा बाजार,
शिरड शहापूर आणि गोरेगाव येथील योजनांच्या प्रगतीचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
विद्युत
जोडणीअभावी प्रलंबित असलेल्या सिरला, टाकळगव्हाण, तपोवन, फत्तेपूर, ब्राह्मणगाव,
खापरखेडा, राजापूर, चिखली, वांझोळा, हिंगणी, मसोड, हिवरा तर्फे जवळा, शिवणी बु.
आणि वरुड काझीसह अन्य गावांतील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली असून, आवश्यक
विद्युत जोडणीची विहित प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या योजना कार्यान्वित
करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सादर करण्यात आलेल्या नियोजनानुसार
प्रत्यक्षात कामे पूर्ण होत आहेत की नाही, यावर नियमित देखरेख ठेवण्याचे निर्देशही
त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत जलजीवन
मिशन अंतर्गत त्रयस्थ तांत्रिक तपासणी करण्यात आलेल्या योजनांचाही आढावा घेण्यात
आला. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटी, तांत्रिक उणिवा व प्रलंबित बाबींची
तात्काळ पूर्तता करून त्याबाबतचा अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित
विभागांना देण्यात आले.
जलजीवन मिशनचे
उद्दिष्ट प्रत्येक ग्रामीण कुटुंबापर्यंत सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचविणे हे
असून, योजनेची सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित
विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
यांनी यावेळी केले.
*******
No comments:
Post a Comment