16 July, 2026

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली(जिमाका), दि. १६ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच इतर अभ्यासक्रमांमध्ये सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महामंडळाकडून उपलब्ध निधीच्या अधीन राहून गुणवत्ता व ज्येष्ठतेच्या आधारे जिल्ह्यातील प्रथम ३ ते ५ पात्र विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. २८ जुलै २०२६ रोजी कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावेत. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा स्वीकार करण्यात येणार नाही, असे जिल्हा व्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे.

अर्जासोबत मूळ कागदपत्रे व त्यांच्या दोन प्रती सादर करणे आवश्यक असून त्यामध्ये गुणपत्रिका (मार्कशीट), शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो, पुढील वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र तसेच जिल्हा व्यवस्थापक यांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज यांचा समावेश असावा.

अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, सरकारी दवाखान्याजवळ, हिंगोली – ४३१५१३ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

****

No comments: