• बेरोजगार, उद्योजक, महिला बचत गट व विद्यार्थ्यांसाठी योजना उपलब्ध
हिंगोली (जिमाका), दि. 10: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या 14 उपकंपन्यांमार्फत इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वयंरोजगार, उद्योग, व्यवसाय, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणासाठी विविध कर्ज व व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.
महामंडळामार्फत 1 लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना राबविण्यात येत असून अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान 500 असावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असावे. कर्जाची परतफेड 48 समान मासिक हप्त्यांत करावी लागेल. नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज भरावे लागणार नाही. मात्र, थकीत हप्त्यांवर वार्षिक 4 टक्के व्याज आकारले जाईल. 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजनेत कर्जाच्या 75 टक्के रक्कम बँकेमार्फत, 20 टक्के महामंडळामार्फत तर 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग राहील. या योजनेत रु. 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध असून परतफेडीचा कालावधी 5 वर्षे (60 समान हप्ते) आहे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत बँकेमार्फत 15 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत असावे. महामंडळाच्या वेबपोर्टलवर नोंदणी अनिवार्य असून नियमित कर्जफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना 12 टक्क्यांपर्यंतच्या मर्यादेत व्याज परतावा अनुदान स्वरूपात आधार लिंक बँक खात्यात दरमहा जमा केला जाईल. उद्योग सुरू असल्याचे किमान दोन छायाचित्रे ऑनलाइन अपलोड करणे आवश्यक आहे.
गट कर्ज व्याज परतावा योजनेत 10 ते 50 लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा आहे. बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी, एलएलपी, एफपीओ आदी पात्र संस्थांना बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्षांदरम्यान असावे आणि यापूर्वी अन्य शासकीय कर्ज योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नियमित कर्जफेडीवर व्याज परतावा महामंडळामार्फत देण्यात येईल.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेत देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी 10 लाखांपर्यंत तर परदेशी शिक्षणासाठी 20 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांचे वय 17 ते 30 वर्षे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपर्यंत आणि बारावीमध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. नियमित कर्जफेडीवर व्याज परतावा महामंडळाकडून देण्यात येईल.
महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना महाराष्ट्र राज्य महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातील किमान 50 टक्के महिलांचा समावेश असलेल्या पात्र महिला बचत गटांना प्रथम टप्प्यात 5 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. नियमित परतफेड करणाऱ्या गटांना 12 टक्क्यांपर्यंत व्याज परतावा अनुदान स्वरूपात आधार लिंक बँक खात्यात जमा करण्यात येतो.
या सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांनी महामंडळाच्या www.msobefdc.org या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसाला बाजार, हिंगोली येथे किंवा दूरध्वनी क्रमांक (02456) 224442 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे.
********
No comments:
Post a Comment