* जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा कळमनुरी दौरा
हिंगोली (जिमाका), दि. 18 : विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान प्रभावीपणे राबवून पात्र एकही मतदार मतदार यादीपासून वंचित राहणार नाही, याची संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. तसेच मतदार नोंदणी प्रक्रियेदरम्यान नागरिकांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवून त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज कळमनुरी दौऱ्यादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन विशेष संक्षिप्त सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदार नोंदणी, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती, स्थलांतर आदी प्रक्रियेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधून मतदार नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्यांचे त्वरित निराकरण करून त्यांना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मतदार यादी अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी कळमनुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रविकांत दरक यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांची पाहणी
या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली. रुग्णालयातील स्वच्छता, उपचार व्यवस्था, औषधांचा उपलब्ध साठा तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा त्यांनी आढावा घेतला. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, तत्पर व वेळेत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर त्यांनी शहरातील पुलाचीही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली.
*******







No comments:
Post a Comment