·
पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणासह
नोंदणी तातडीने पूर्ण करावी
·
राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटींचा लाभ
हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी
कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ
मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण
करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल
क्रमांकाशी संलग्न करून अॅग्रीस्टॅक पोर्टलवरील नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे
आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ व
अतिवृष्टीमुळे पीक कर्जाची वेळेत परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025
या कालावधीत वितरित झालेल्या व 30
सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचा विचार
करण्यात येणार असून, पात्र शेतकऱ्यांना प्रति
शेतकरी कमाल दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.
यापूर्वीच्या कर्जमुक्ती योजनेचा
लाभ घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांवरील 50
हजार रुपयांची मर्यादा शासनाने रद्द केली असून, अशा शेतकऱ्यांनाही
आता दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. तसेच नियमित कर्जफेड
करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27
मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात
आली आहे.
दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी
असलेल्या शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार असून, उर्वरित
रक्कम 'एक रक्कमी समझोता'
योजनेअंतर्गत भरता येणार आहे. यासाठी 31
मार्च 2027 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
राष्ट्रीयीकृत, व्यापारी, खासगी
तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माहितीच्या आधारे राबविण्यात येणाऱ्या या
योजनेमुळे राज्यातील 56 लाख
शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील
व्यापारी, खासगी, राष्ट्रीयीकृत तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील संभाव्य
थकीत पीक कर्ज खात्यांचा डेटा कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्याचे काम राज्यस्तरावर
पूर्ण झाले असून, पुढील अंतिम कार्यवाही सुरू आहे. पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात
लवकरच कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.
कर्जमाफीच्या लाभात कोणताही विलंब
होऊ नये आणि कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी न केलेल्या
शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करावी. तसेच बँक खाते, मोबाईल क्रमांक, जमीन
नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात आणि मयत खातेदारांच्या वारसांची नोंद पूर्ण करावी,
असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment