राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली आहे. या सुधारित निर्णयामुळे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ मधील लाभार्थी शेतकऱ्यांनाही अधिक व्यापक स्वरूपात कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
शेती हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्जमुक्तीच्या विविध योजना राबविल्या आहेत. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे.
योजनेच्या प्रारंभीच्या तरतुदीनुसार, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ मधील लाभार्थी शेतकऱ्यांनी त्यानंतर घेतलेल्या कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकी ५० हजार रुपयांपर्यंत असल्यास त्यांना कमाल ५० हजार रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार होता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेनुसार या निर्णयात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली असून, आता अशा पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे २०१९ नंतर विविध कारणांमुळे कर्जाची नियमित परतफेड करू न शकलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांची पत सुधारण्यास मदत होईल. भविष्यात बँकांकडून नव्याने पीककर्ज उपलब्ध होण्यासही याचा सकारात्मक परिणाम होणार आहे. तसेच शेतीमध्ये नव्याने गुंतवणूक करण्यासाठी आणि उत्पादनवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.
योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी शासनाने डिजिटल प्रणालीचा अवलंब केला आहे. पात्र लाभार्थी निश्चित करण्यासाठी संबंधित बँकांकडील कर्ज खात्यांची माहिती, आधार पडताळणी आणि अन्य आवश्यक तपासणी केली जाणार आहे. अंतिम पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाच्या मंजुरीनंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
योजनेचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक (फार्मर आयडी) नोंदणीला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी तयार केलेला नाही, त्यांनी महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून नोंदणी पूर्ण करावी. तसेच आधार क्रमांक, बँक खाते आणि इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवावी. यामुळे कर्जमुक्तीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शासनाकडून आणि संबंधित बँकांकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे. कर्ज खात्याची माहिती वेळोवेळी तपासून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ मधील सुधारित निर्णय हा राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. विशेषतः महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०१९ मधील लाभार्थी शेतकऱ्यांना आता दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ उपलब्ध करून देण्याचा निर्णय त्यांच्या आर्थिक पुनर्बांधणीसाठी मोलाचा ठरणार आहे. शेती अधिक सक्षम, शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना या निर्णयामुळे निश्चितच बळ मिळणार आहे.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*********
No comments:
Post a Comment