22 July, 2026

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत उद्या घेणार हिंगोली जिल्ह्याचा आढावा

 


हिंगोली, दि.२२ (जिमाका): छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे उद्या, गुरुवार (दि.२३) रोजी हिंगोली जिल्हा दौ-यावर येत असून, या दौ-यात ते विविध विकासकामांचा व प्रशासकीय विषयांचा सविस्तर आढावा घेणार आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, निवडणूक, पुनर्वसन, नैसर्गिक आपत्ती, न्यायालयीन प्रकरणे, ई-फेरफार, तसेच विविध प्रलंबित विषयांचा विभागनिहाय बैठकीत विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे आढावा घेणार आहेत.

बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, शासकीय जमिनीची उपलब्धता, डेटा सेंटरसाठी जमीन संपादन, ग्रामीण वस्तींसाठी शासकीय जमिनीचे वाटप, डिजिटल क्रॉप सर्व्हे, जमीन संकलनाशी संबंधित विविध प्रकरणे तसेच प्रलंबित महसुली प्रकरणांचा आढावा घेतला जाणार आहे.

याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचा आढावा, भूसंपादनाची प्रकरणे, नैसर्गिक आपत्ती मदत, गौण खनिज, वसुली, न्यायालयीन प्रकरणे, ई-फेरफार, डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्राम, कर्मचारी समाधान शिबिर तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यांसाठी सुचविलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबतही चर्चा होणार आहे.

या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

*****

No comments: