27 July, 2026

बियाणे तक्रारींचे तातडीने निवारण करुन दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा

 

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींचा आढावा




हिंगोली (जिमाका), दि. 27 : शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या बियाणे तक्रारींचे तातडीने व पारदर्शक पद्धतीने निवारण करावे. तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे तक्रारींच्या अनुषंगाने बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, कृषी विकास अधिकारी अतुल वायसे तसेच विविध बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यात प्राप्त झालेल्या बियाणे तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित बियाणे कंपन्यांनी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच प्राप्त तक्रारींवर कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या. शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती सादर केली. तसेच शेतकऱ्यांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करण्यासाठी समन्वयाने काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.

***

No comments: