30 September, 2026

दुष्काळात तातडीचा आधार, भविष्यासाठी चारा सुरक्षा; राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण

*विशेष लेख*

*दुष्काळात तातडीचा आधार, भविष्यासाठी चारा सुरक्षा; राज्यात प्रथमच वैरण विकास धोरण*
                            *किंवा*
*वैरण विकास कार्यक्रम : पशुपालनाला स्थैर्याची नवी दिशा*

  राज्यातील पशुपालक आणि शेतकऱ्यांसाठी वैरण विकास कार्यक्रम हा केवळ चारा उपलब्धतेचा प्रश्न सोडविणारा उपक्रम न ठरता पशुपालन अर्थव्यवस्थेला स्थैर्य देणारे महत्वाचे पाऊल ठरणार आहे. स्थानिक पातळीवर वर्षभर पुरेसा आणि पौष्टिक चारा उपलब्ध करण्यावर भर दिल्यास पशुपालकांचे बाहेरील चाऱ्यावरचे अवलंबित्व कमी होऊ शकते. शासकीय पडीक, गायरान तसेच उपलब्ध जमिनींचा नियोजनबद्ध वापर करून चारा उत्पादन वाढविणे, सुधारित चारा वाणांना प्रोत्साहन देणे आणि वैरणीच्या झाडांची लागवड वाढविणे यामुळे पशुधनासाठी सातत्यपूर्ण खाद्यसुरक्षा निर्माण होण्यास मदत होईल. त्यातून पशुधनाचे आरोग्य व उत्पादकता टिकून राहण्याबरोबरच दुग्ध व्यवसायाचा खर्च नियंत्रित करण्यास हातभार लागू शकतो. विशेषतः दुष्काळ आणि पावसाच्या अनिश्चिततेच्या काळात चारा टंचाईवर तात्पुरती उपाययोजना करण्याऐवजी दीर्घकालीन व्यवस्था उभारणे, हे या कार्यक्रमाचे सर्वाधिक महत्वाचे वैशिष्ट्य ठरते.

  पशुपालन व्यवसायासाठी चारा ही जीवनरेखा आहे. राज्यातील हिरव्या व सुक्या चाऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारने प्रथमच ‘वैरण विकास धोरण’ लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दुष्काळी भागात तातडीने चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच राज्यासाठी दीर्घकालीन चारा सुरक्षा निर्माण करण्याच्या दुहेरी उद्देशाने हे धोरण जाहीर केले आहे. राज्यातील सुमारे २ कोटी ७८ लाख पशुधनासाठी हिरवा आणि सुका चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी चारा लागवडीचे क्षेत्र वाढविणे, उपलब्ध चाऱ्याची गुणवत्ता सुधारणे, त्याची योग्य पद्धतीने साठवणूक करणे आणि पर्यायी चारा संसाधनांना चालना देणे, अशा व्यापक उपाययोजनांचा धोरणात समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी ४९६ कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीचे नियोजन असून, वार्षिक १२ हजार लाभार्थ्यांना रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

  २०२६ च्या खरीप हंगामात ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीवरील उपाययोजनांसाठी २५ सप्टेंबर २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यामध्ये जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजनेचाही समावेश आहे.

*चारा तूट कमी करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना*

  राज्यातील पशुधन संख्या, उपलब्ध चारा आणि चाऱ्याची तूट विचारात घेऊन उपाययोजना सुचविण्यासाठी २० नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यस्तरीय कृती दल स्थापन करण्यात आले होते. या कृती दलाने चारा टंचाई दूर करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस केली आहे.

  राज्यात सुमारे २ कोटी ७८ लाख पशुधन आहे. या पशुधनासाठी १ हजार १७६.७८ लाख मेट्रिक टन हिरव्या चाऱ्याची गरज असताना ९०७.४९ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. हिरव्या चाऱ्याची तूट २६८.३७ लाख मेट्रिक टन म्हणजेच २२.७९ टक्के आहे. सुक्या चाऱ्याची गरज ३७७.८७ लाख मेट्रिक टन असून, प्रत्यक्ष उपलब्धता २९६.६२ लाख मेट्रिक टन आहे. त्यामुळे सुक्या चाऱ्याची तूट ८१.०६ लाख मेट्रिक टन म्हणजे २१.४३ टक्के आहे. पशुपालन व्यवसायासाठी चारा हा अत्यावश्यक घटक असल्याने ही तूट भरून काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपायांची आवश्यकता आहे.

 *पडीक व गायरान जमिनीवर चारा लागवड*

  चारा लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी महसूल आणि वन विभागाच्या शासकीय पडीक, गायरान किंवा मुलकी पड जमिनींचा वापर करण्याचा विचार आहे. कुरण आणि गायरान जमिनींमध्ये सुधारित गवत तसेच द्विदल चारा पिकांच्या जातींची लागवड केली जाणार आहे. ‘हॉर्टी-पाश्चर’ पद्धतीत फळबागांमधील दोन झाडांच्या मोकळ्या जागेत चारा वाणांची लागवड करून दुहेरी उत्पादन घेण्यात येणार आहे. ‘सिल्वी-पाश्चर’ पद्धतीत पडीक, खडकाळ किंवा डोंगराळ जमिनीवर सुबाभूळ, अंजन आणि शेवगा यांसारख्या चारा देणाऱ्या झाडांसोबत बहुवार्षिक गवताची लागवड केली जाईल.

  शेतातील बांध, बंधारे, तलावांचे बांध, परसबाग, जलमार्ग तसेच नापीक आणि मशागतीस अयोग्य जमिनींचाही चारा उत्पादनासाठी उपयोग केला जाणार आहे. अशा जागांवर गिनी गवत, सिग्नल गवत आणि स्टायलो गवताची लागवड करण्याचा प्रस्ताव आहे.

*चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यावर भर*

  उपलब्ध चाऱ्याचे केवळ प्रमाण वाढविण्याबरोबरच त्याची गुणवत्ता आणि पौष्टिक मूल्य सुधारणे हा धोरणाचा महत्वाचा भाग आहे. त्यासाठी मुरघास निर्मिती, चाऱ्यावर युरिया प्रक्रिया, कापूस पिकाच्या टाकाऊ अवशेषांवर ओझोन प्रक्रिया आणि एन्झाइम अर्थात विकर प्रक्रिया अशा तंत्रांचा वापर केला जाणार आहे. कृषी अवशेष आणि कृषी प्रक्रिया उद्योगांमधील उपपदार्थांचा योग्य वापर करून त्यांचे पौष्टिक खाद्यगट्टे व मुरघासामध्ये रूपांतर करण्यात येईल. यामुळे अन्यथा वाया जाणाऱ्या कृषी अवशेषांचा पशुखाद्यासाठी उपयोग होऊन चारा सुरक्षेला बळकटी मिळणार आहे.

*शास्त्रीय साठवणुकीतून टंचाईग्रस्त भागांना पुरवठा*

  वैरण विकास धोरणानुसार, उपलब्ध चारा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी शास्त्रीय साठवणुकीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यासाठी ‘हे बेल्स’, ‘फीड ब्लॉक’, ‘लीफ मिल’ आणि कडबाकुट्टी या पद्धतींचा अवलंब केला जाईल. चाऱ्याची टिकाऊक्षमता वाढल्याने अतिरिक्त उत्पादनाच्या काळात त्याची साठवणूक करून टंचाईच्या काळात गरजू भागांना पुरवठा करणे शक्य होणार आहे.

  चारा कापणी, प्रक्रिया, वाहतूक आणि जनावरांना चारा देताना होणारा अपव्यय रोखण्यावरही भर दिला जाणार आहे. योग्य प्रक्रिया व साठवणुकीमुळे उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर करता येणार आहे.

  पारंपरिक चारा पिकांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी पर्यायी चारा संसाधनांना प्रोत्साहन देण्यात येईल. त्यामध्ये अझोला उत्पादन, हायड्रोपोनिक पद्धतीने चारा निर्मिती आणि काटेविरहित निवडुंगाचा चारा म्हणून वापर यांचा समावेश आहे. कमी जमीन आणि मर्यादित पाण्यामध्ये चारा उपलब्ध करून देण्यासाठी या पर्यायांचा उपयोग होणार आहे.

  वैरण ग्राहक सेवा केंद्रांची निर्मिती, सार्वजनिक-खासगी भागीदारीतून चारा विकास, चारा विकास विस्तार उपक्रम आणि संस्थात्मक बियाणे साखळी उभारणे या पूरक उपाययोजनांचाही धोरणात विचार करण्यात आला आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्याने चारा उत्पादन, प्रक्रिया व उपलब्धतेची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

*दुष्काळी भागांसाठी तातडीचा लाभ*

  सद्यस्थितीत जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कमी पाण्यात चारा उत्पादन घेण्यावर अल्पकालीन भर दिला जाणार आहे. उपलब्ध चाऱ्याची टिकाऊक्षमता वाढवून त्याची योग्य साठवणूक केल्यास पुढील काळात टंचाईग्रस्त भागांना पुरवठा करणे सुलभ होईल.

  दीर्घकालीन उपायांमधून पशुपालनासाठी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध करणे, पशुजन्य उत्पादनांमध्ये स्वयंपूर्णता साधणे आणि पशुपालन व्यवसायाला उद्योजकतेचे स्वरूप देण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेतून सुमारे २५ लाख लाभार्थ्यांना लाभ अपेक्षित असून, त्यापैकी वैरण विकास कार्यक्रमातून वार्षिक १२ हजार रोजगार निर्माण करण्याचे नियोजन आहे. पशुपालकांचे उत्पन्न वाढल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे.

*‘विकसित महाराष्ट्र २०४७’ शी थेट जोड*

  ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ कार्यक्रमामध्ये पीक अवशेष आणि कृषी प्रक्रिया उद्योगांतील उपपदार्थांचा वापर पौष्टिक खाद्यगट्टे व मुरघास निर्मितीसाठी करून चारा सुरक्षा मजबूत करण्याच्या उपाययोजनेचा समावेश आहे. त्याद्वारे दुग्धव्यवसाय आणि पशुपालन या शेतीपूरक व्यवसायांना उद्योजकतेचे स्वरूप देण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला आहे. राज्यात पशुपालन व्यवसायामध्ये उद्योजकता निर्माण करण्याच्या व्यापक धोरणातून वार्षिक सुमारे २५ लाख लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन आहे. त्यासाठी अंदाजे ४ हजार ५०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद प्रस्तावित आहे. यातील वैरण विकासाशी संबंधित कार्यक्रमासाठी १२ हजार लाभार्थी आणि ४९६ कोटी रुपयांच्या तरतुदीचे नियोजन करण्यात आले आहे.

  वैरण विकास धोरणाचा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे चारा टंचाईकडे केवळ आपत्कालीन मदत म्हणून न पाहता चारा उत्पादन, जमीन वापर, गुणवत्तापूर्ण वाण आणि साठवणूक यांचे दीर्घकालीन नियोजन करण्याकडे शासनाचा कल आहे.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर करण्यात आले असून या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील पशुधनासाठी आवश्यक चाऱ्याची उपलब्धता अधिक सक्षमपणे उपलब्ध होईल. तसेच पशुपालन आणि दुग्धव्यवसाय या शेतीपूरक व्यवसायांना भक्कम बळ मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा मिळेल.

- *पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री*

000

नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद

नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’
‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद
मुंबई, दि. ३०:  नवरात्रोत्सवात राज्यातील महाविद्यालयीन तरुणाईच्या आरोग्याचा जागर केला जाणार आहे. वाढता स्क्रीन टाइम, अपुरी झोप, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि मानसिक ताण यामुळे तरुणांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. या पार्श्वभूमीवर आजार टाळण्यासाठी तरुण वयापासूनच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जागृती व्हावी, यासाठी राज्यात प्रथमच ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा नऊ दिवसांचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमातून राज्यातील विद्यापीठे आणि वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक व वैद्यकीय तज्ज्ञ राज्यभरातील विद्यार्थ्यांशी थेट आरोग्यविषयक संवाद साधणार आहेत.

*विद्यार्थ्यांशी थेट संवाद*
राज्यातील वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य, कला आणि इतर विद्याशाखांतील विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि वैद्यकीय तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. तरुण वयात आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे परिणाम पुढील आयुष्यात जाणवू शकतात. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार घेण्याबरोबरच आजार टाळण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, मानसिक आरोग्याची काळजी, व्यसनांपासून दूर राहणे आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागृत राहण्याबरोबरच ही माहिती कुटुंब, मित्र आणि समाजापर्यंत पोहोचवावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

*संवादाचे विषय :*
-  बदलती जीवनशैली आणि तरुणांचे आरोग्य
-  संतुलित आहार आणि बदललेल्या आहाराच्या सवयी
-  व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्ती
-  मानसिक आरोग्य
-  मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढता स्क्रीन टाइम
-  व्यसनांपासून दूर राहणे
-  निरोगी जीवनशैली आणि आरोग्यदायी समाजनिर्मिती

‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ हा उपक्रम राज्यातील तरुणाईशी थेट संवाद साधणारा हा पहिलाच उपक्रम आहे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत तरुणांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांवर त्यांच्याशी थेट संवाद साधणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना या संवादातून आरोग्याशी संबंधित प्रश्न मोकळेपणाने मांडता येणार आहेत. तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती आरोग्यदायी जीवनशैली करिता विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार असल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी म्हटले आहे.
००००००

जिल्हा परिषद हिंगोलीतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’च्या दुसऱ्या आठवड्यात विविध लोकाभिमुख उपक्रम

जिल्हा परिषद हिंगोलीतर्फे ‘सेवा संकल्प अभियान’च्या दुसऱ्या आठवड्यात विविध लोकाभिमुख उपक्रम
हिंगोली, दि. ३० सप्टेंबर (जिमाका) : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद हिंगोलीअंतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. अभियानाच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील विविध विभाग, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून नागरिकाभिमुख विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.

घरकुल लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेतील २१०, रमाई आवास योजनेतील १७०, शबरी आवास योजनेतील १२ आणि मोदी आवास योजनेतील ७० लाभार्थ्यांच्या घरी हा उपक्रम राबविण्यात आला.

कृषी योजनांच्या लाभार्थ्यांना विविध सुविधांचा लाभ

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना विविध कृषीविषयक घटकांचा लाभ देण्यात येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२६-२७ अंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, विद्युत जोडणी आकार, पीव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग आदी घटकांचा लाभ देण्यात येत असून, एकूण २९६ लाभार्थ्यांपैकी २१ लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२६-२७ अंतर्गतही नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, विद्युत जोडणी आकार, पीव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग आदी घटकांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेतील एकूण १४६ लाभार्थ्यांपैकी १४ लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ लावण्यात आला.

तसेच, जिल्हा परिषद सेस निधीतून कडबा कुट्टी यंत्र, जनावरांच्या गोठ्यावर सोलर दिवे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, ३५ लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.

लाभार्थ्यांच्या घरी दिवा प्रज्वलित करून घरकुलाच्या चाव्यांचे वाटप

पंचायत समिती सेनगावअंतर्गत आजेगाव, लिंगदरी, खेरखेडा, काहाकर बु. आणि दाताडा बु. आदी ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर लोकाभिमुख योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला.

पंचायत समिती हिंगोलीअंतर्गत राहोली, भोगाव, नांदुरा आणि लासीना ग्रामपंचायतींमध्येही घरकुल लाभार्थ्यांच्या घरी ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. पूर्ण झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.

दरम्यान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी राहोली बुद्रुक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभार्थी श्रीमती रेखाताई लोणकर यांच्या घरकुल व फुलशेतीची पाहणी केली. संबंधित लाभार्थ्यांनी ५० फूट विहीर खोदली असून, दुष्काळी परिस्थितीतही विहिरीत ४५ फूट पाणी उपलब्ध आहे. तसेच त्यांनी फुलशेतीचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. डॉ. ठोंबरे यांनी लाभार्थी शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन योजनेच्या माध्यमातून झालेल्या लाभाची माहिती जाणून घेतली व कामाबाबत समाधान व्यक्त केले.

वसमत तालुक्यात स्वच्छता व जनजागृती

पंचायत समिती वसमतअंतर्गत ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागातून रॅली काढून प्लास्टिकमुक्त अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली. शौचालय अनुदानाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या घरांवर ‘सेवा संकल्प आशीर्वाद दिवा’ प्रज्वलित करण्यात आला. सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करून नागरिकांनी त्यांचा नियमित वापर करावा, याबाबतही जनजागृती करण्यात आली.

गंभीर आजारांनी पीडित रुग्णांना आर्थिक मदत

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागातील गंभीर आजारांनी पीडित रुग्णांना जिल्हा परिषद सेस निधीतून आर्थिक मदत देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध असून, प्रति रुग्ण १० हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून ३०० लाभार्थ्यांना मदत देण्याचे उद्दिष्ट असून, लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू आहे.

नागरिकाभिमुख प्रशासनाला प्राधान्य

‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करणे, तसेच गरजू नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर जिल्हा परिषद हिंगोलीकडून भर देण्यात येत आहे.

अभियानाच्या पुढील टप्प्यातही सर्व विभाग, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यांच्या समन्वयातून विविध लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे गुरुवारी आकाशवाणीवर भाषण सेवा संकल्प अभियान, स्वच्छ सेवा आकलन उपक्रमाची देणार माहिती

 मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचे गुरुवारी आकाशवाणीवर भाषण

सेवा संकल्प अभियान, स्वच्छ सेवा आकलन उपक्रमाची देणार माहिती


        हिंगोली, दि. ३० (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ आणि ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रमाची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आपल्या भाषणातून देणार आहेत. त्यांचे भाषण गुरुवार, दि. १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.४० वाजता परभणी आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणार आहे. हे भाषण मोबाईलवरही ऐकू शकाल. त्यासाठी आकाशवाणीचे ॲप 

https://play.google.com/store/apps/details?id=com.allindiaradio.akashvani.airnews यावरून डाउनलोड करावे लागेल.

स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत 1 ऑक्टोबरला ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ महा-श्रमदान जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत 1 ऑक्टोबरला ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ महा-श्रमदान

जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन


        हिंगोली, दि. ३० (जिमाका) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत जिल्ह्यात ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. यावर्षी ‘स्वच्छतेमध्ये सहभाग, स्वच्छ भारत- विकसित भारत’ ही संकल्पना घेऊन विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत आहेत.

        या अभियानांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुके व ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व श्रमदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याच मोहिमेचा एक भाग म्हणून 1 ऑक्टोबर 2026 रोजी देशभरात एकाच वेळी ‘महा-श्रमदान-एक दिन, एक घंटा, एक साथ’ हे अभियान राबविण्यात येणार आहे.

        स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, युवक, ग्रामस्थ, विविध सेवाभावी संस्था, मंडळे, महिला बचत गट तसेच लोकप्रतिनिधींनी 1 ऑक्टोबर रोजी आपल्या गावातील ग्रामपंचायत, मंदिर, शाळा, रस्ते, नदीघाट, बाजारपेठ आदी सार्वजनिक ठिकाणी एक तास श्रमदान करून या देशव्यापी अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाणे यांनी केले आहे.

जिल्हा परिषद येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा

 जिल्हा परिषद येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा


        हिंगोली, दि. 30 सप्टेंबर (जिमाका) : जिल्हा परिषद, हिंगोली येथे २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ बाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती औंढा नागनाथचे सहाय्यक गटविकास अधिकारी आर. बी. परांडकर यांनी माहितीचा अधिकार अधिनियमातील विविध तरतुदी, माहिती मागणी करण्याची प्रक्रिया, अर्ज सादर करण्याची कार्यपद्धती तसेच प्रथम व द्वितीय अपीलाची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व आणि नागरिकांना माहिती मिळण्याच्या अधिकाराचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

        अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी आपल्या मनोगतात माहितीचा अधिकार हा नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कायदा असल्याचे सांगितले. माहितीच्या अधिकाराचा प्रभावी व जबाबदारीने, कायदेशीर तरतुदींनुसार वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच सार्वजनिक प्राधिकरणांनी आपल्या कार्यपद्धतीत पारदर्शकता व उत्तरदायित्व कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

        यावेळी माहिती अधिकार अर्जावर विहित कालमर्यादेत कार्यवाही करणे, सार्वजनिक प्राधिकरणांची माहिती उपलब्ध करून देण्याची जबाबदारी, प्रथम व द्वितीय अपीलाची कार्यपद्धती तसेच माहितीचा अधिकार अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

        कार्यक्रमास प्रकल्प संचालक डॉ. नामदेव केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती समृद्धी दिवाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री. गड्डापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) विजय बोराटे, शिक्षणाधिकारी (योजना) संदीप सोनटक्के यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

        कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘पारदर्शक प्रशासनासाठी माहितीचा अधिकार’ या विषयाबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांना त्यांच्या माहितीच्या अधिकाराची जाणीव करून देतानाच प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकाभिमुखता अधिक बळकट करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

निवृत्तीवेतनधारकांसाठी 6 ऑक्टोबर रोजी महा-उपलब्धी मोबाईल अॅपबाबत कार्यशाळेचे आयोजन

 निवृत्तीवेतनधारकांसाठी  6 ऑक्टोबर रोजी 

महा-उपलब्धी मोबाईल अॅपबाबत कार्यशाळेचे आयोजन

        हिंगोली, दि. 30 सप्टेंबर (जिमाका): राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन विषयक सेवा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागामार्फत ‘Maha-uplabdhi (महा-उपलब्धी)’ हे मोबाईल अॅप सुरू करण्यात आले आहे.

        शासन निर्णय, दि. १९ जून २०२६ अन्वये सुरू करण्यात आलेल्या या मोबाईल अॅपच्या वापराबाबत निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना माहिती देण्यासाठी मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

        या कार्यशाळेस प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई हे ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहून निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच Maha-uplabdhi मोबाईल अॅपचा वापर, त्यातील विविध सुविधा आणि निवृत्तीवेतन विषयक सेवांचा लाभ घेण्याच्या पद्धतीबाबत माहिती देण्यात येणार आहे.

        हिंगोली जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सदर कार्यशाळेस उपस्थित राहून Maha-uplabdhi मोबाईल अॅपबाबत माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनजीत गोरेगावकर यांनी केले आहे.

सेवा संकल्प अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे भटके विमुक्त विशेष शिबिर संपन्न; शिबिरात विविध प्रमाणपत्रांचे वाटप

 सेवा संकल्प अभियानांतर्गत सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे भटके विमुक्त विशेष शिबिर संपन्न

शिबिरात विविध प्रमाणपत्रांचे वाटप

        हिंगोली, दि. ३० (जिमाका) : जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ सुलभतेने मिळावा, या उद्देशाने सेनगाव तालुक्यातील मौजे बाभुळगाव येथे मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी भटके विमुक्त विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

        विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांची भटक्या जीवनशैली लक्षात घेता, त्यांना आवश्यक असलेली शासकीय कागदपत्रे व प्रमाणपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिबिरात विविध सेवांची सुविधा देण्यात आली. नागरिकांनी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत आवश्यक प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ घेतला.

        शिबिरामध्ये ५ लाभार्थ्यांना आधार कार्ड, १४ लाभार्थ्यांना शिधापत्रिका, २९ लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र, २४ लाभार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला, १७ लाभार्थ्यांना नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, ३१ लाभार्थ्यांना रहिवासी/अधिवास दाखला, तसेच १२ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना/श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला अशी माहिती तहसीलदार सेनगाव यांनी दिली.

        विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत अशा विशेष शिबिरांचे आयोजन करून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.



29 September, 2026

हिंगोली जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक हृदय दिन’ साजरा

हिंगोली जिल्हा रुग्णालयात ‘जागतिक हृदय दिन’ साजरा
निरोगी हृदयासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार व तणावमुक्त जीवनशैलीचा सल्ला

हिंगोली, दि. २९ (जिमाका) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे ‘जागतिक हृदय दिनानिमित्त’ विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि ‘स्टेमी’ प्रकल्पांतर्गत आयोजित या कार्यक्रमात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हृदयाचे आरोग्य जपण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी तरुणांमध्येही हृदयविकाराचा धोका वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. बदलती जीवनशैली, मानसिक ताणतणाव आणि अयोग्य आहारपद्धती यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनशैलीत सकारात्मक बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी निरोगी हृदयासाठी दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे, योग किंवा हलका व्यायाम करण्याचा सल्ला दिला. आहारातील मीठ, साखर आणि तेलाचे प्रमाण कमी ठेवावे. पालेभाज्या, फळे व तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करावा. धूम्रपान व तंबाखूचे सेवन टाळावे. पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी हृदयविकाराची लक्षणे दिसताच तातडीने वैद्यकीय मदत घेण्याचे आवाहन केले. छातीत तीव्र दुखणे, डावा हात किंवा जबडा दुखणे तसेच अचानक मोठ्या प्रमाणात घाम येणे ही हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. अशा वेळी विलंब न करता शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. ‘स्टेमी’ प्रकल्पांतर्गत हृदयविकाराच्या रुग्णांसाठी तत्पर उपचार सुविधा उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमादरम्यान रुग्णालय परिसरात हृदयविकाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि निरोगी जीवनशैलीबाबत भित्तीपत्रके व माहितीपत्रकांद्वारे जनजागृती करण्यात आली. तसेच उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याची सामूहिक शपथ घेतली.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, डॉ. नंदू करवा, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, डॉ. नितीन पुरोहित, वैद्यक डॉ. आर. एस. बोथीकर, जिल्हा समन्वयक डॉ. किरण लोंढे, मेट्रॉन श्री. चिंचकर, ‘स्टेमी’ समन्वयक रत्नाकर निळकंठे, दीपक लोखंडे, सचिन रुपुरकर, नितीन पांढरे यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

लाभार्थ्यांच्या घरी आज लागणार ‘आशीर्वादाचा दिवा’ - मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड

लाभार्थ्यांच्या घरी आज लागणार ‘आशीर्वादाचा दिवा’
 - मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड
_कामचुकारांवर कारवाई; ‘काम नाही, वेतन नाही’ तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी_

हिंगोली, दि. २९ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय सेवांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या घरी  उद्या (बुधवार, ३० सप्टेंबर) ‘आशीर्वादाचा दिवा’ लावण्यात येणार आहे. संबंधित विभागांनी लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन ही कार्यवाही नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिले.

सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी त्यांना नेमून दिलेल्या दत्तक गावांना आठवड्यातून किमान एक दिवस भेट द्यावी. गावातील विकासकामे आणि विविध शासकीय उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रभावीपणे राबवावा. २ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छता कार्यक्रम आयोजित करावेत. प्रत्येक शाळा व अंगणवाडीमध्ये परसबाग तयार करावी, असेही निर्देश देण्यात आले.
प्रत्येक कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठका घेण्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा. तसेच जिल्ह्यात महिला बचत गटांची मोठ्या प्रमाणावर स्थापना करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.

कामकाजात निष्काळजीपणा आणि दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश देताना त्यांनी ‘काम नाही, वेतन नाही’ या तत्त्वाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट केले. कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. संबंधितांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत ‘आपले सरकार’ पोर्टल, पीजी पोर्टल तसेच शासन स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आयुष्मान भारत व वय वंदना कार्ड, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके आदींच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. संबंधित कामकाजात आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले.

बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) समृद्धी दिवाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मंजुश्री कल्लेवाड, शिक्षणाधिकारी (योजना) संदीप सोनटक्के, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - विभागीय आयुक्त जी.श्रीकांत

निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे - विभागीय आयुक्त जी.श्रीकांत
नोडल अधिकाऱ्यांची बैठक  

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ सप्टेंबर : ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी सर्व संबंधित पथकांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली नोडल अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सहआयुक्त प्रताप काळे, मंजुषा मिसकर, रित्रा मेत्रेवार, देविदास टेकाळे, खुशालसिंह परदेशी तसेच विविध कक्षांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

श्रीकांत म्हणाले की, नामनिर्देशन, छाननी, मतदान व मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्याची तयारी वेळेत पूर्ण करावी. नामनिर्देशन अर्जांची काटेकोर तपासणी, मतदार यादीत नाव शोधण्याची सुविधा, मतदान साहित्य व मतपेट्यांची सुरक्षित वाहतूक तसेच मतमोजणी केंद्रावरील व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्यावे. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत प्रशिक्षण देऊन त्यांची तयारी पूर्ण करावी.

नामनिर्देशन कक्षात अर्जांचे वाटप व स्वीकार तसेच उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची पुरेशी व्यवस्था ठेवावी. आवश्यक कागदपत्रे, चलन पावती, छायाचित्र व एबी फॉर्मची तपासणी करावी. उमेदवारांना शपथ देण्यासाठी अधिकारी नियुक्त करावेत. ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या छाननीसाठी तपासणी यादी तयार ठेवावी. अर्ज बाद झाल्यास कारणांसह आदेश देण्याची कार्यवाही करावी. नामनिर्देशनाची सूचना व संबंधित माहिती सूचना फलकावर तसेच संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी.

मतदान व मतमोजणीसाठी वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे करावी. मतदानानंतर मतपेट्या सुरक्षितपणे मतमोजणी केंद्रावर आणण्याची व्यवस्था करावी. मतमोजणी केंद्रावर ५६ टेबल्सची व्यवस्था करण्यात येत असून, संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. मतमोजणीच्या तीन दिवस आधी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घ्यावा.

पहिले प्रशिक्षण १० ऑक्टोबर, दुसरे १७ ऑक्टोबर आणि मतदान साहित्य वाटपाच्या दिवशी २२ ऑक्टोबर रोजी अंतिम प्रशिक्षण घेण्याचे नियोजन करावे. केंद्राध्यक्ष, क्षेत्रीय अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक तसेच संबंधित पथकांना प्रशिक्षण द्यावे. मतमोजणीसाठी स्वतंत्र पथक तयार करून त्यांचे प्रशिक्षण १४ ऑक्टोबरच्या आसपास पूर्ण करावे. मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची व्यवस्था करावी.

उमेदवारांची संख्या ५६ पेक्षा जास्त झाल्यास मतपत्रिका व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या उपलब्धतेनुसार नियोजन करावे. निवडणुकीसाठी सुमारे ३० हजार मतपत्रिकांची आवश्यकता लागू शकते, त्यानुसार छपाईचे नियोजन करावे. निवडणूक साहित्य व आवश्यक शिक्क्यांचा पुरेसा साठा ठेवावा.

मतदानाची पद्धत तसेच कोणत्या कारणांमुळे मत बाद होऊ शकते, याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करावी. निवडणूक कामासाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन करून कामाचे वाटप करावे. दररोज नामनिर्देशन अर्जांचे वाटप व प्राप्त अर्जांची माहिती माध्यमांना द्यावी. आचारसंहितेच्या काळात सर्व शासकीय कामकाज करताना निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

******

औंढा नागनाथ मंदिर परिसरातील विकासकामांना गती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी; संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना

 औंढा नागनाथ मंदिर परिसरातील विकासकामांना गती

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून पाहणी; संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना



हिंगोली, दि. २९ (जिमाका) : औंढा नागनाथ येथील मंदिर व परिसरातील विकासकामांची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज पाहणी केली. परिसरातील पाणी निचरा, भूमिअभिलेख, टोपोग्राफिकल सर्वेक्षण आणि विकासकामांच्या नियोजनाबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.


मंदिर परिसराची भूमिअभिलेख विभागाने मोजणी करून नकाशावर जीओ-कॉरडीनेट व जमिनीचे तलांक नमूद करावेत. हा नकाशा सातबारा उताऱ्याशी एकत्रित करून कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी संबंधीत विभागाला दिले.


परिसरातील पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी जमिनीची पातळी सुधारण्यासह ड्रेनेजची पुनर्बांधणी, नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याच्या सूचना दिल्या. या कामांसाठी सविस्तर प्रस्ताव तयार करून जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.


मंदिर परिसराच्या सुमारे ५०० मीटरपर्यंतच्या भागाचे टोपोग्राफिकल सर्वेक्षण करून पाणी निचरा व व्यवस्थापनाचे नियोजन करावे. विकासकामांचा नियमित आढावा घेण्यासाठी सॉफ्टवेअर आधारित प्रणालीचा वापर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.


यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जोशी, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, तहसीलदार हरीश गाडे, पुणे येथील वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्य दिन साजरा सन १९७१ च्या युद्धातील माजी सैनिकांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

 जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्य दिन साजरा

सन १९७१ च्या युद्धातील माजी सैनिकांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान



हिंगोली, दि. २९ (जिमाका) : भारतीय सैन्य दलाच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे स्मरण आणि माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज शौर्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सन १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात शौर्याचे कार्य बजावलेल्या माजी सैनिकांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.


दिनांक २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानच्या हद्दीत दहशतवादी तळांवर सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण व अभिमानास्पद कामगिरीची माहिती जनतेपर्यंत व्यापक स्वरूपात पोहोचविण्यासाठी तसेच माजी सैनिकांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो.


कार्यक्रमाची सुरुवात निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, लेखा अधिकारी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, वीरमाता व वीरपिता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर भारतमाता व वीर जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक ऑनरेरी कॅप्टन तुकाराम रामराव मुकाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी शौर्य दिनाचे महत्त्व विशद केले. यावेळी सन १९७१ च्या युद्धातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे ऑनरेरी कॅप्टन तुकाराम रामराव मुकाडे यांनी आभार मानले.


कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक ऑ. कॅप्टन तुकाराम रामराव मुकाडे, संघपाल खराटे, कडूजी टापरे, पाईकराव काशिनाथ सुदामराव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या निर्देशांचे पालन करून साधेपणाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक संपन्न अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीचा घेतला आढावा

 जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक संपन्न

अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीचा घेतला आढावा



हिंगोली, दि. २९ (जिमाका) : अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ ची प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण तसेच अन्न सुरक्षेशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली.

बैठकीस समितीचे सदस्य जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाचे कृषी उपसंचालक पी. एम. हजार, उद्योग अधिकारी रविंद्र पत्की, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पवन खताळ यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील अन्न आस्थापनांची संख्या, अन्न आस्थापनांची तपासणी, तपासणीअंती करण्यात आलेली कारवाई तसेच १ एप्रिल २०२६ पासून आजपर्यंत अन्न नमुन्यांबाबत करण्यात आलेल्या कारवाईचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा घेतला.

तसेच जप्ती व धाडीची प्रकरणे, दूध भेसळीच्या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेले दुधाचे नमुने, दुग्धजन्य पदार्थांचे नमुने तसेच खाद्यतेलाच्या नमुन्यांबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहितीही यावेळी घेण्यात आली.

अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनासाठी आरोग्य संस्थांनी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनासाठी आरोग्य संस्थांनी प्राधान्याने कामे पूर्ण करावीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



* १५ दिवसात सुधारणा न झाल्यास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कारवाईचे निर्देश


हिंगोली, दि. २९ : जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (एनक्वॉस) प्राप्त करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता आणि रुग्णाभिमुख कार्यपद्धतीत सुधारणा करून सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती. 


यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्ता डूडूळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. डी. व्ही. सावंत, डॉ. संदीप काळे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार यांच्यासह सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी संबंधित अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्राप्त करण्यासाठी सर्व आरोग्य संस्थांनी जबाबदारीने व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यक पायाभूत सुविधा, दुरुस्तीसाठी निधी हा ज्या विभागामध्ये सुधारणा करायच्या आहेत आणि सद्यस्थितीतील गुणांकनाबाबत आणि भविष्यातील गुणांकनाबाबत  सुधारणा होणार आहेत, याची माहिती लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.  कोणत्या खंडातून निधी उपलब्ध करता येईल, तसा उल्लेख करण्यात यावा, विनाकारण प्रस्ताव सादर न करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. उपलब्ध स्थानिक निधीतून खर्च भागविता येत असतील ते त्या उपलब्ध निधीच्या माध्यमातून तातडीने पूर्ण करावेत.

शासकीय आरोग्य संस्थेत प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रसूती गृह हे स्वच्छ आणि निटनेटके असले पाहिजे. कुशल कर्मचारीवृंद असावा आणि आरोग्य विभागात देत असलेल्या सेवांवर जनतेचा विश्वास असला पाहिजे असे काम करावे लागेल अशा सूचना दिल्या.

 रुग्णालयांतील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला. 

या बैठकीत बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती सेवा, प्रयोगशाळा, औषध भांडार, प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड योजना, रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन प्रक्रियेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येणार असून, सर्वांनी  पुढील १५ दिवसात सुधारणा करावी. ही शेवटची संधी आहे,

यानंतर कामांमध्ये सुधारणा न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

या कामात हलगर्जीपणा अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

00000

भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानांतर्गत तीन गावांत शिबिरे

 भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानांतर्गत तीन गावांत शिबिरे 

▶️रेशन कार्ड, जात, रहिवासी, उत्पन्न प्रमाणपत्रांसह आयुष्मान भारत कार्डचे वाटप



हिंगोली, दि. २९ (जिमाका) : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक शासकीय प्रमाणपत्रे व कागदपत्रे सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात आले.

अभियानांतर्गत हिंगोली तालुक्यातील कोथळज, औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर आणि कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये पात्र नागरिकांना रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला तसेच आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले.

२७ सप्टेंबर रोजी कोथळज येथे तहसीलदार श्रीकांत भुजबळ व उपविभागीय अधिकारी समाधान घटुकडे यांच्या उपस्थितीत शिबिर झाले. २८ सप्टेंबर रोजी सुकापूर येथे तहसीलदार हरीश गाडे यांच्या उपस्थितीत शिबिर घेण्यात आले. २९ सप्टेंबर रोजी पोतरा येथे उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतीक्षा भुते यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

भटक्या जीवनशैलीमुळे आवश्यक कागदपत्रे मिळविण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क व शासकीय सुविधांचा लाभ सुलभतेने मिळावा, हा अभियानाचा उद्देश आहे.

28 September, 2026

हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा; वेळेवर उपचारासाठी ‘स्टेमी महाराष्ट्र’चा आधार

जागतिक हृदय दिन  विशेष – २९ सप्टेंबर

हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा; 
वेळेवर उपचारासाठी ‘स्टेमी महाराष्ट्र’चा आधार

५० लाखांहून अधिक ईसीजी तपासण्या; ३४ जिल्ह्यांत २,४१५ स्पोक केंद्रे आणि ९९ हब रुग्णालयांचे जाळे

मुंबई, दि. २८ : हृदयविकाराचा झटका आल्यानंतरचा प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. ‘गोल्डन अवर’मध्ये योग्य निदान आणि उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचण्यास मदत होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये हृदयविकाराचे तातडीने निदान आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ५० लाखांहून अधिक ईसीजी तपासण्या करण्यात आल्या असून, त्यामधून ३४ हजारांहून अधिक स्टेमी रुग्णांचे तसेच १ लाख ४५ हजारांहून अधिक इतर गंभीर हृदयविकाराच्या रुग्णांचे निदान करण्यात आले आहे.

‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पांतर्गत राज्यात २,४१५ स्पोक शासकीय आरोग्य केंद्रे  (जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण, सामान्य रुग्णालये, स्त्री रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र) आणि कॅथलॅब उपलब्ध असलेली ९९ हब रुग्णालये (खासगी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालये, धर्मादाय रुग्णालये) कार्यरत आहेत.  स्पोक केंद्रांमध्ये प्राथमिक पातळीवर ईसीजी तपासणी करून त्याचा अहवाल क्लाऊडवर अपलोड होतो. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने काही मिनिटांत ईसीजीचे विश्लेषण केले जाते. स्टेमीचे निदान झालेल्या रुग्णाला स्पोक रुग्णालयात सुविधा उपलब्ध असल्यास तातडीने थ्रोम्बोलायसिस उपचार देण्यात येतात.  पुढील उपचारासाठी रुग्णाला १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने संबंधित हब रुग्णालयात पाठविण्यात येते.

३४ जिल्ह्यांत हृदयविकार उपचाराचे जाळे

सुरुवातीला राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात आला. सध्या महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये २,४१५ स्पोक आरोग्य केंद्रे या प्रकल्पाशी जोडण्यात आली आहेत. तसेच ९९ हब रुग्णालये प्रगत हृदयविकार उपचारांसाठी सज्ज आहेत. हब रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली  उपचार, अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, बायपाससारख्या सुविधा उपलब्ध आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना संबंधित उपचारांचा लाभ मिळतो. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने योग्य उपचार केंद्राशी जोडणे शक्य होत आहे.

ईसीजी तपासणीला प्राधान्य

हृदयविकाराचा संशय असलेल्या रुग्णाची तातडीने ईसीजी तपासणी करणे हा स्टेमी प्रकल्पातील महत्त्वाचा भाग आहे. छातीत दुखणे, छातीत दडपण येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे, चक्कर येणे, मळमळ होणे किंवा वेदना जबडा, मान, खांदा अथवा हाताकडे जाणे अशी लक्षणे आढळल्यास विलंब न करता वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे.

मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, तंबाखूचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, असंतुलित आहार, अनुवंशिकता आणि मानसिक ताण यामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रतिबंधात्मक तपासणीसह लक्षणे दिसताच तातडीने ईसीजी करणे महत्त्वाचे आहे.

हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा

जागतिक हृदय दिनानिमित्त ‘हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा’ हा संदेश देत नागरिकांनी आपल्या हृदयाच्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. हृदयविकाराची लक्षणे दुर्लक्षित न करता वेळेत ईसीजी आणि आवश्यक उपचार घेणे, तसेच निरोगी आहार, नियमित शारीरिक हालचाल आणि व्यसनांपासून दूर राहणे, हे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

*स्टेमी म्हणजे काय?*

STEMI म्हणजे ST Elevation Myocardial Infarction. हा हृदयविकाराच्या झटक्याचा एक गंभीर प्रकार असून, हृदयाच्या काही भागाला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबल्यामुळे अपुऱ्या ऑक्सिजनमुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.

स्टेमी महाराष्ट्र कार्यक्रमात समाविष्ट शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक ईसीजी उपकरणाच्या सहाय्याने हृदयरोगाची लक्षणे असलेल्या रुग्णाचा ईसीजी काढून क्लाऊडवर अपलोड होतो. प्रगत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर  आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने १० मिनिटांत ईसीजीचे विश्लेषण करून  अहवाल इंटरनेटच्या माध्यमातून संबंधित रुग्णालयाला पाठविला जातो. 
यासाठी बंगळुरूस्थित ट्रायकॉग हेल्थ या संस्थेशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. 

चौकट :- “हृदयविकाराचा झटका आल्यानंतर उपचारासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो. ग्रामीण भागातील नागरिकांनाही वेळेत ईसीजी तपासणी, अचूक निदान आणि आवश्यक उपचार मिळावेत, या उद्देशाने ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाचा राज्यभर विस्तार करण्यात आला आहे. आज ३४ जिल्ह्यांमध्ये २,४१५ स्पोक आरोग्य केंद्रे आणि ९९ हब रुग्णालयांच्या माध्यमातून हृदयविकाराच्या रुग्णांना तातडीच्या उपचारांशी जोडले जात आहे. या प्रकल्पांतर्गत ५० लाखांहून अधिक ईसीजी तपासण्या होणे ही या उपक्रमाची व्यापक पोहोच दर्शविणारी बाब आहे. नागरिकांनी हृदयविकाराची लक्षणे दुर्लक्षित न करता तातडीने ईसीजी तपासणी करून आवश्यक वैद्यकीय उपचार घ्यावेत. ‘हृदयाचा प्रत्येक ठोका महत्त्वाचा’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे.”
 प्रकाश आबिटकर
मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.

चौकट :-  “हृदयविकाराची लक्षणे ओळखणे आणि वेळ न दवडता योग्य उपचार घेणे ही जनजागृतीची महत्त्वाची बाब आहे. ‘स्टेमी महाराष्ट्र’ प्रकल्पाच्या माध्यमातून ईसीजी तपासणीची सुविधा नागरिकांच्या जवळच्या शासकीय आरोग्य संस्थांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि हृदयविकाराचा धोका असलेल्या नागरिकांनी नियमित आरोग्य तपासणीसह हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. वेळेवर निदान आणि उपचारातून अनेक गंभीर परिस्थिती टाळता येऊ शकतात.”

मेघना साकोरे बोर्डीकर 
राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.

मसोड येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर१५६ रुग्णांची तपासणी; विविध आरोग्य तपासण्या व औषधोपचार

मसोड येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिर
१५६ रुग्णांची तपासणी; विविध आरोग्य तपासण्या व औषधोपचार

हिंगोली, दि. २८ (जिमाका) : प्राथमिक आरोग्य केंद्र, मसोड, ता. कळमनुरी येथे ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात विविध आजारांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. एकूण १५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांच्या उपस्थितीत विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आयुष्मान भारत वंदना कार्ड काढण्यात आले. ‘तिशीचा पल्ला—तपासणी अन् सल्ला’ उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी करण्यात आली. क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत ५० नागरिकांची एक्स-रे तपासणी करण्यात आली.

गरोदर मातांची हिमोग्लोबिन, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार रुग्णांना औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.

शिबिरात अस्थिरोग विभागात १८, नेत्र विभागात १९, गरोदर मातांची ३४, क्षयरोगासाठी एक्स-रे ५०, तर इतर सामान्य आजारांच्या ३५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

यावेळी डॉ. विशाल पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. व्ही. सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, डॉ. शाहरुख शेख, डॉ. जनार्दन बोथीकर, डॉ. राम आसोले, डॉ. संभाजी भोकरे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय रजा नाहीजिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय रजा नाही
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

हिंगोली, दि. २८ (जिमाका) : खरीप हंगाम २०२६ मधील Trigger-1 (प्रथम कळ) अंतर्गत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणाची कामे आणि नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना दिले आहेत.

दुष्काळी परिस्थितीच्या कालावधीत जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. अत्यंत अपरिहार्य आणि अपवादात्मक परिस्थितीत रजेची आवश्यकता असल्यास संबंधित बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून, पूर्वपरवानगी प्राप्त झाल्यानंतरच रजा मंजूर करावी.

या कालावधीत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कर्तव्यावर नियमित उपस्थित राहून दुष्काळाच्या अनुषंगाने सोपविण्यात येणारी कामे तत्परतेने, जबाबदारीने आणि प्राधान्याने पूर्ण करावीत. जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी कर्तव्यावरून अनुपस्थित राहणार नाही, याची दक्षता कार्यालय प्रमुखांनी घ्यावी.

सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनधिकृतपणे अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रचलित सेवा नियमांनुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक समिती-२०२६/प्र.क्र.८२/मदत-२, दि. २५ सप्टेंबर २०२६ अनुषंगाने या परिपत्रकाची तत्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने माहितीचा अधिकार दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा

 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने 

माहितीचा अधिकार दिवस कार्यक्रम उत्साहात साजरा



            हिंगोली, दि. २८ (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने माहितीच्या अधिकाराचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने माहितीचा अधिकार दिवस कार्यक्रम आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्रीमती गीता गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी हा कार्यक्रम घेण्यात आला.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती शकुंतला घुगे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवाजी महाविद्यालय, हिंगोलीचे प्रा. धाराशिव शिराळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कारार्थी बबनराव मोरे, बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, गृहपाल श्रीमती एस. व्ही. ढोणे, गृहपाल श्रीमती ए. ए. अवचार, लघुटंकलेखक श्रीमती पी. पी. गीते आदी मान्यवर उपस्थित होते.

        प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक श्रीमती शकुंतला घुगे यांनी केले.

        माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ या विषयावर प्रा. धाराशिव शिराळे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. माहितीचा अधिकार हा नागरिकांना शासनाच्या कामकाजातील पारदर्शकता व उत्तरदायित्वाबाबत माहिती मिळवून देणारा महत्त्वपूर्ण कायदा असून, नागरिकांनी त्याचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत सुरेश पठाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन समतादूत श्रीमती सुनिता आवटे यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सुमारे २०० ते २५० नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

                                                                  00000

पदवीधर मतदारसंघाच्या प्रारूप मतदान ; केंद्रांबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक

 पदवीधर मतदारसंघाच्या प्रारूप मतदान 

केंद्रांबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक


हिंगोली जिल्ह्यात ३६ प्रारूप मतदान केंद्रे प्रस्तावित

        हिंगोली, दि. २८ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील प्रारूप मतदान केंद्रांबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हा प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

        बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रगती चौंडेकर, नायब तहसीलदार (निवडणूक) विविध राजकीय पक्षाचे जिल्हा प्रमुख तसेच निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली.

        हिंगोली जिल्ह्यात ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एकूण ३६ प्रारूप मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. तालुकानिहाय प्रस्तावित मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे— हिंगोली तालुका १०, कळमनुरी ०७, सेनगाव ०६, वसमत ०९ आणि औंढा नागनाथ ०४.

        ही मतदान केंद्रांची यादी सध्या प्रारूप स्वरूपाची असून, सदर यादी ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून आवश्यक मान्यता प्राप्त झाल्यानंतर अंतिम मतदान केंद्रांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

        बैठकीच्या शेवटी उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चौंडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

                                                                            00000

सुकापूर येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध प्रमाणपत्रांचे वाटप

 सुकापूर येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध प्रमाणपत्रांचे वाटप


         हिंगोली, दि. २८ (जिमाका) : सेवा संकल्प अभियान, भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान तसेच महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन आज (दि. २८) औंढा नागनाथ तालुक्यातील सुकापूर येथे करण्यात आले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तहसीलदार हरीश गाडे यांच्या उपस्थितीत आयोजित या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

         या शिबिरात मंडळ व तहसील स्तरावरील विविध विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. शिधापत्रिका वाटप, उत्पन्न प्रमाणपत्र, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र वितरण, महिला शेतकरी तसेच नमुना क्रमांक ८ मधील नोंदी आदी विविध सेवांअंतर्गत एकूण २२० प्रमाणपत्रे व कागदपत्रांचे वितरण करण्यात आले.

        यावेळी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आदी योजनांबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आरोग्य, कृषी, पुरवठा आणि पंचायत समिती विभागाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र नागरिकांना लाभ मिळवून देण्यात आला.


        शिबिरात तहसीलदार हरीश गाडे, सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, हिंगोली प्रदीप धर्माधिकारी, आरोग्य विभागाचे डॉ. गिते, पुरवठा निरीक्षक कल्याणी हटवार, कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, मंडळ अधिकारी आशा गिते-गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी जी. एस. मुकीर, रूपा कळसकर, एस. बी. दुबे, महसूल सहायक नितीन कुलकर्णी, वहीद खान पठाण, महसूल सेवक केशव फलटनकर, विनोद साळवे, अक्षय कांबळे, भगवान कदम तसेच संबंधित विभागांचे अधिकारी-कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

                                                                            ***


दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय रजा मंजूर करू नये

 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अधिकारी-कर्मचाऱ्यांना पूर्वपरवानगीशिवाय रजा मंजूर करू नये

        हिंगोली, दि. 28 (जिमाका) : खरीप हंगाम 2026 मधील Trigger-1 (प्रथम कळ) अंतर्गत जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणाची कामे तसेच नागरिकांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. 

        दुष्काळी परिस्थितीचा कालावधी लक्षात घेता, जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांनी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोणत्याही प्रकारची रजा मंजूर करू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. अत्यंत अपरिहार्य व अपवादात्मक परिस्थितीत रजेची आवश्यकता असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी त्याबाबतची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून, पूर्वपरवानगी प्राप्त केल्यानंतरच संबंधितांची रजा मंजूर करावी.

        या कालावधीत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन कर्तव्यावर नियमितपणे उपस्थित राहून दुष्काळाच्या अनुषंगाने सोपविण्यात येणारी कामे तसेच कार्यालयीन कामकाज तत्परतेने, जबाबदारीने आणि प्राधान्याने पार पाडावे, असेही निर्देश आहेत. जिल्हाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी कर्तव्यावरून अनुपस्थित राहणार नाही, याची दक्षता कार्यालय प्रमुखांनी घ्यावी, असे परिपत्रक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्गमित केले आहे. 

        सदर सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अनधिकृतपणे अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रचलित सेवा नियमांनुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

        दरम्यान, मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक : समिती-2026/प्र.क्र.82/मदत-2, दि. 25 सप्टेंबर 2026 अनुषंगाने सदर परिपत्रकाची तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महसूलमंत्र्यांनी स्वीकारली शेतकरी व नागरिकांची निवेदने

 


महसूलमंत्र्यांनी स्वीकारली शेतकरी व नागरिकांची निवेदने

        हिंगोली, दि. २८ (जिमाका) : दुष्काळसदृश्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार, शेतकरी तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांशी संबंधित निवेदने स्वीकारली.

        सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, आमदार डॉ. प्रज्ञा सातव व पदाधिकारी आदीची उपस्थिती होती. 

        यावेळी विविध प्रश्न व मागण्यांबाबत नागरिकांनी महसूलमंत्री श्री. बावनकुळे यांच्याकडे निवेदने सादर केली. शेतकऱ्यांच्या अडचणी, दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना तसेच स्थानिक पातळीवरील विविध विकासकामांबाबतही नागरिकांनी आपल्या मागण्या मांडल्या.

        महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित निवेदनांची दखल घेत, नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. 

दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे



 दुष्काळसदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल.

– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

कळमनुरी तालुक्यातील अराठी येथे पीक परिस्थितीची पाहणी;  तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

        हिंगोली, दि. २६ (जिमाका) : दुष्काळसदृश्य परिस्थितीत शासन संवेदनशीलतेने काम करीत असून, शेतकरी, विद्यार्थी, शेतमजूर, नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विविध सवलती व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव आणि वसमत या पाचही तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. या तालुक्यांतील पीक परिस्थितीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानीची वस्तुनिष्ठ माहिती प्रशासनाने संकलित करावी, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, शासन त्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

        


        महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कळमनुरी तालुक्यातील अराठी येथे दुष्काळसदृश्य पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतातील पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. पिकांचे नुकसान, पावसातील खंड आणि सद्यःस्थितीबाबत शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. संकटाच्या काळात शासनाकडून आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

        यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार रामराव वडकुते, आमदार संतोष बांगर, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, जिल्हा कृषी विकास अधिकारी अतुल वायसे, उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते, तहसीलदार जे. के. कांबळे, तालुका कृषी अधिकारी के. एस. जाधव, पदाधिकारी, शेतकरी आदी उपस्थित होते.

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तात्काळ पंचनामे

        जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व तालुक्यांतील पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पीक नुकसानीचे वस्तुनिष्ठ चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल. दुष्काळाच्या परिस्थितीत चारा, पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक मदत याबाबत तत्परतेने काम करण्यात येईल असेही सांगितले. 

तीन लाख हेक्टरवरील खरीप पिकांवर परिणाम

        हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे तीन लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यापैकी सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ३३ हजार हेक्टरवर तूर, तर ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड करण्यात आली आहे. पावसाचा लांबलेला खंड आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे विशेषतः सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्याचे यावेळी सांगितले.

चारा, पाणी व जलसंधारणाच्या उपाययोजनांवर भर

        राज्य शासन संवेदनशीलतेने काम करीत असून, राज्यातील मंत्री, खासदार आणि आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करीत आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे, जलसंधारणाची कामे सुरू करणे, पिण्याच्या पाण्याचे तसेच पशुधनासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे, यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

        दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व नागरिकांना आवश्यक तो दिलासा मिळेल, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचनाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.

00000

गाव स्वच्छतेचा आता डिजिटल ‘आरसा’ ग्रा.पं.चे होणार स्वयं मूल्यांकन

 गाव स्वच्छतेचा आता डिजिटल ‘आरसा’  ग्रा.पं.चे होणार स्वयं मूल्यांकन

        हिंगोली, दि. २८ (जिमाका) : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 अंतर्गत ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि शाश्वत करण्यासाठी ‘स्वच्छ सेवा आकलन’ उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे वार्षिक डिजिटल स्वयंमूल्यांकन करण्यात येणार असून, ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छता सेवांची सद्यस्थिती आणि कार्यक्षमता तपासली जाणार आहे.

        हिंगोली जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतींच्या स्वच्छता विषयक कामकाजाचे आता डिजिटल पद्धतीने मूल्यांकन होणार आहे. स्वच्छ पाणी, घनकचरा व्यवस्थापन, द्रवरूप कचरा व्यवस्थापन, शौचालय वापर व देखभाल, सार्वजनिक स्वच्छता यासारख्या विविध निकषांवर ग्रामपंचायतींचे स्वयं मूल्यांकन करण्यात येईल. यामुळे स्वच्छता कामांत पारदर्शकता येऊन नागरिकांचा सहभाग वाढणार आहे.

३१ ऑक्टोबर पर्यंत करण्यात येणार स्वयमूल्यांकन

        ग्रामपंचायतींनी निर्धारित कालावधीत स्वयंमूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले आहे.‘स्वच्छ सेवा आकलना’मध्ये स्वच्छतेची स्थिती, शाश्वत, घनकचरा व्यवस्थापन, द्रव कचरा व्यवस्थापनाच्या साधनांचे कार्यान्वयन व देखभाल तसेच समुदायाचा सहभाग यावर भर दिला जाणार आहे.

२ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा

        ‘स्वच्छ सेवा आकलन’च्या तिसऱ्या टप्प्यात २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ग्रामपंचायतस्तरावर स्वयं-मूल्यांकन करण्यात येणार आहे. स्वयं-मूल्यांकनानंतर प्राप्त अहवाल तयार करून २ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे. या ग्रामसभेत अहवालावर चर्चा करून माहितीची पडताळणी केली जाणार आहे. चर्चेनंतर आवश्यक सुधारणा करून अंतिम माहिती पोर्टलवर सादर करण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.

ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका

१. स्वच्छ सेवा आकलनाच्या प्रक्रियेत ग्रामपंचायत सचिवांची भूमिका महत्त्वाची आहे. ग्रामपंचायत सचिवांनी आपल्या ग्रामपंचायतीच्या लॉगिनमधून ई-ग्रामस्वराज पोर्टलवर ओडीएफ प्लस (मॉडेल) ग्रामपंचायतींची प्राप्त माहिती भरायची आहे.

२. त्यानंतर ही माहिती ग्रामसभेसमोर चर्चा व पडताळणी साठी ठेवून आवश्यक ठरावावर मंजुरी घेण्यात येणार आहे.

३. ग्रामसभेच्या मान्यतेनंतर आवश्यक सुधारणा करून अंतिम माहिती पोर्टलवर सादर करावी लागणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मनोगत

        “हिंगोली जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी ओडीएफ प्लस आणि घनकचरा व्यवस्थापनात चांगले काम केले आहे. मात्र आता या कामाची डिजिटल पडताळणी होणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीने ई-ग्रामस्वराज पोर्टलवर भरलेली माहिती हीच खरी आरसा आहे. ती माहिती गावकऱ्यांसमोर मांडली तर पारदर्शकता वाढेल. सर्व ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासक आणि सरपंचांनी ही प्रक्रिया गांभीर्याने घ्यावी.” - जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड


जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा

 जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकार दिन साजरा


        हिंगोली, दि. २८ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तहसीलदार श्री. तोटावर, नायब तहसीलदार श्री. गोळेगावकर, नायब तहसीलदार श्री. जोशी यांच्यासह कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

        माहितीचा अधिकार अधिनियम हा प्रशासनातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा शासनाच्या कामकाजातील सहभाग वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण कायदा आहे. नागरिकांना शासकीय कामकाजाची माहिती मिळण्याचा अधिकार असून, या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

        माहिती अधिकार दिनानिमित्त उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहितीचा अधिकार अधिनियमातील तरतुदी, अर्ज प्रक्रिया, माहिती उपलब्ध करून देताना घ्यावयाची दक्षता तसेच नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचा सन्मान राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

                                                                            00000

27 September, 2026

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर उद्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका), दि. 27 सप्टेंबर : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर या सोमवार, दि. 28 सप्टेंबर 2026 रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

सोमवार, दि. 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वा. मोटारीने सेलु जि. परभणी येथून अराठी जि. हिंगोली येथे आगमन. सकाळी 11 वा. मा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या समवेत दुष्काळग्रस्त भागाचा पीक पाहणी दौरा. ठिकाण :- अराठी जि. हिंगोली. सकाळी 11.45 वा. मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 12 वा.  हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. मोटारीने मसुड ता. कळमनुरी जि. हिंगोली कडे प्रयाण. दुपारी 2 वा. सेवा संकल्प अभियान निमित्त आरोग्य शिबिरास उपस्थिती. ठिकाण मसुड ता. कळमनुरी जि. हिंगोली. दुपारी 3 वा. मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील.
00000

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

*दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी*
*‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन*

  मुंबई, दि.  : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमातून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजार ८६२ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये दहा दिवसांत सुमारे २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

  मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे भाविकांना घराजवळच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली.

  भाविकांना आरोग्य तपासणीसाठी दूर जावे लागू नये आणि आजारांचे वेळेत निदान व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. शिबिरांमध्ये हृदयरोग, किडनीविकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या भाविकांना पुढील तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित रुग्णालयांकडे पाठविण्यात आले.

  शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले. पुढील उपचारांची गरज असलेल्या पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

*विभागनिहाय आकडेवारी*

  विदर्भात ९ हजार ८३४ शिबिरांमध्ये ५ लाख ९४ हजार ६३६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मराठवाड्यात ७ हजार ६३१ शिबिरांमध्ये ४ लाख ५६ हजार ८६३, ठाणे-पालघर भागात ६ हजार १७ शिबिरांमध्ये ३ लाख १७०, कोकणात ३ हजार २४९ शिबिरांमध्ये १ लाख ३७ हजार १४८, उत्तर महाराष्ट्रात ५ हजार ८३८ शिबिरांमध्ये २ लाख ८८ हजार ९४०, तर पश्चिम महाराष्ट्रात १२ हजार ४२४ शिबिरांमध्ये ७ लाख ६६ हजार ७६२ भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर, पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेले संदर्भित रुग्ण ५ हजार ९९३ आहेत.

*सलग दुसऱ्या वर्षी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद*

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला यंदा दुसऱ्या वर्षी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा देण्यात आली. ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजारांहून अधिक शिबिरांत सुमारे २९ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी झाली. आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी योग्य ठिकाणी पाठविण्यात आले. विविध यंत्रणा, गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविता आला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
000

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे २८ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर; दुष्काळग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांचे निवेदन स्विकारतील.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे २८ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

दुष्काळग्रस्त भागाची पाहणी व नागरिकांचे निवेदन स्विकारतील

हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दुष्काळग्रस्त भागातील पीक पाहणी व नागरिकांचे निवेदने स्विकारतील. 

सोमवार 28 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वा. मोटारीने उमरखेड येथून वारंगाफाटा मार्गे मौजा अराठी जि. हिंगोली येथे आगमन. सकाळी 11 वा. दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा. स्थळ:- मौजा अराठी ता. कळमनुरी जि. हिंगोली. सकाळी 11.45 वा. मोटारीने मौजा अराठी येथून कळमनुरी मार्गे सा. बां. विभाग विश्रामगृह हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 12 ते 1 वाजेपर्यत नागरीकांचे निवेदन स्विकारण्यासाठी राखीव. स्थळ :- शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंगोली. दुपारी 1 वा. मोटारीने हिंगोली येथून कळमनुरी-डोंगरकडा मार्ग अर्धापूर जि. नांदेड कडे प्रयाण करतील. 
00000

26 September, 2026

सेवा संकल्प अभियानांतर्गत निशाणा येथे विविध उपक्रम

*स्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य तपासणीसह नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप*

हिंगोली, दि. २६ (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमाच्या माध्यमातून औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत निशाणा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती समृद्धी दिवाणे यांच्या उपस्थितीत स्वच्छता ही सेवा, प्लास्टिकमुक्त गाव, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी तसेच सुशासन व नागरिक सेवा उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी ग्रामस्थांना प्लास्टिकमुक्त गाव अभियानांतर्गत प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, प्लास्टिकचा वापर टाळण्याचे महत्त्व आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नागरिकांसाठी आरोग्य तपासणी उपक्रमही राबविण्यात आला.

‘सुशासन व नागरिक सेवा’ उपक्रमांतर्गत नागरिकांना आवश्यक विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये जन्म प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र, महिला शेतकरी प्रमाणपत्र तसेच आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. शासनाच्या विविध नागरिकाभिमुख सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देत सेवा सुलभ व गतिमान करण्यावर यावेळी भर देण्यात आला.

या उपक्रमास ग्रामस्थ, संबंधित अधिकारी-कर्मचारी, प्रशासक तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना व सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

सेवा संकल्प अभियानांतर्गत औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे वसई येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांची भेट; विविध उपक्रमांची पाहणी व मार्गदर्शन


हिंगोली,( दि. २६) सप्टेंबर:-देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत 'सेवा संकल्प अभियान' राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान' आणि विविध लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती देण्याचे प्रशासकीय निर्देश देण्यात आले आहेत.
​
शासन निर्णय (सामान्य प्रशासन विभाग, दि. ९ सप्टेंबर २०२६), ग्रामविकास विभाग (दि. १६ सप्टेंबर २०२६) आणि जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार (दि. २२ सप्टेंबर २०२६) जिल्ह्याभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत.

​याच पार्श्वभूमीवर, आज दिनांक २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ०७ वाजता जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी औंढा नागनाथ तालुक्यातील ग्रामपंचायत मौजे वसई येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले.

​'सेवा माझे योगदान' मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम

​ग्रामपंचायत मौजे वसई येथे 'सेवा संकल्प अभियाना'अंतर्गत 'सेवा माझे योगदान' या मोहिमेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते:

​स्वच्छता ही सेवा (प्लास्टिकमुक्त गाव): गावात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिकमुक्त गाव करण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.
​वृक्षारोपण: पर्यावरण संवर्धन व हरित गावाच्या ध्येयाने परिसर वृक्षारोपण करण्यात आले.

​सेवा ज्योत यात्रा: अभियानाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी सेवा ज्योत यात्रेचे आयोजन करण्यात आले.

​आरोग्य तपासणी शिबिर: ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत तपासणी व सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले.

​सेवा सेतू अभियान (दाखले व प्रमाणपत्रे वाटप): नागरिकांना आवश्यक असणारे विविध शासकीय दाखले आणि प्रमाणपत्रांचे तात्काळ वाटप करण्यात आले.

​अधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती
​अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे यांनी या सर्व उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

​या प्रसंगी ग्रामपंचायत मौजे वसईचे प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, तसेच पंचायत समिती औंढा नागनाथचे सहाय्यक गटविकास अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंगोली जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्लास्टिकमुक्त दिन’ उत्साहात

⏺️उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांची पिंपळदरी ग्रामपंचायतीला भेट

⏺️ ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान राबविण्याचे आवाहन

हिंगोली, दि. २६ (जिमाका) : जिल्ह्यातील ५६३ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्लास्टिकमुक्त दिन’ अभियान उत्साहात राबविण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी ग्रामपंचायतीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड यांच्या उपस्थितीत प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यात आला.

पिंपळदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन गड्डापोड यांनी शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत अध्यापन केले. तब्बल दोन तास विविध वर्गांमध्ये जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना बाराखडी तसेच मूलभूत शैक्षणिक घटकांचे मार्गदर्शन केले. त्यांच्या या उपक्रमाला शिक्षक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पिंपळदरी परिसर आदिवासीबहुल असून गावाचा सामाजिक आणि आरोग्यविषयक दर्जा उंचावण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन गड्डापोड यांनी केले.
गावात स्वच्छता, आरोग्य आणि विकासाची कामे सातत्याने राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यापूर्वी पिंपळदरी ग्रामपंचायतीमध्ये ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने यंदाही अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावाच्या विकासाला गती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.