हिंगोली, दि. 1 सप्टेंबर (जिमाका) : सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दर्गा रोड, हिंगोली येथे ३१ ऑगस्ट रोजी ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजकार्य महाविद्यालय, बुलढाणा येथील प्राचार्य एन. ए. गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते चंद्रशेखर पाटील (निलंगा, जि. लातूर), बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, ज्ञानेश्वर सातपुते, नारायण बाबर तसेच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी उपस्थित होते. यावेळी विजाभज आश्रमशाळेतील शिक्षक व विद्यार्थी, अशासकीय सदस्य, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी व कर्मचारी, वसंतराव नाईक महामंडळाचे कर्मचारी तसेच इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात ३१ ऑगस्ट या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच भटक्या-विमुक्त समाजाची संस्कृती, जीवनमूल्ये आणि सामाजिक योगदान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ब्रिटिश सरकारने १८७१ मध्ये Criminal Tribes Act लागू करून अनेक भटक्या जमातींना जन्मजात गुन्हेगार म्हणून घोषित केले होते. भारत सरकारने १९५२ मध्ये हा कायदा रद्द करून या जमातींना ‘विमुक्त’ (Denotified) असा दर्जा दिला. मात्र, या समाजावर असलेला सामाजिक भेदभाव आणि आर्थिक दुर्लक्ष दूर करण्यासाठी अद्यापही व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचे वक्त्यांनी नमूद केले.
सहाय्यक संचालक प्रदीप धर्माधिकारी, प्राचार्य एन. ए. गायकवाड आणि प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे यांनी भटके-विमुक्त समाजाच्या हक्कांबाबत जागृती, शिक्षण, रोजगार आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ याविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर पाटील यांनी भटके-विमुक्त समाजासाठी करण्यात आलेल्या विविध कार्यांची माहिती दिली. तसेच या समाजाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांवर प्रकाश टाकला.
या निमित्ताने आश्रमशाळा स्तरावर विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, वृक्षारोपण, भटके-विमुक्त लोककलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण व निबंध स्पर्धा, तसेच ‘सेटलमेंट’व १९५२ चा गुन्हेगार कायदा या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी व पालकांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दीपली सोनकांबळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निरीक्षक मनिष राजुलवार, बालाजी टेंभुर्णे, भास्कर वाकळे, जयदीप देशपांडे, प्रतिक सरनाईक, उखा मुरकुटे, बिना कोकणी, प्रफुल चवरे, सचिन टाले, संतोष गलांडे, नीरज राठोड, विश्वनाथ खोकले, धीरज गोरकर, तसेच इतर मागास बहुजन कल्याण मुलींचे शासकीय वसतिगृह, हिंगोलीच्या गृहपाल श्रद्धा तडकसे यांच्यासह वसतिगृहातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
00000
No comments:
Post a Comment