01 September, 2026

सीएसआर निधीतून जिल्हा परिषदेच्या सहा वर्गखोल्या बांधण्यात येणार


▶️ जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची तत्त्वतः परवानगी

▶️ साळवा, भौसीसह बोरी सावंत शाळेचा समावेश


हिंगोली, दि. 01 (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यातील तीन जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) निधीतून प्रत्येकी दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तत्त्वतः परवानगी दिली आहे. त्यामुळे तीन शाळांना एकूण सहा नवीन वर्गखोल्या उपलब्ध होणार आहेत. 


सीएसआर उपक्रमांतर्गत मुंबई येथील रवींद्र एनर्जी लिमिटेड, पुणे येथील श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. आणि उत्तर प्रदेश येथील ट्रूआरई कॉस्मिक प्रा. लि. या कंपन्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येकी दोन वर्गखोल्या बांधण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत संबंधित कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संमतीपत्रे सादर केली आहेत. संबंधित संमतीपत्रांमध्ये सीएसआर निधीतून दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्याची तयारी दर्शविण्यात आली आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीनंतर संबंधित कंपन्यांनी वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी संमती दर्शविली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकामांना तत्त्वतः परवानगी दिली आहे. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील साळवा, औंढा नागनाथमधील भौसी आणि वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा समावेश आहे. 


वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी शाळेची जागा निश्चित करून सीमांकन करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात केली जाईल. बांधकाम करताना आवश्यक वैधानिक व तांत्रिक मान्यता, संबंधित विभागाच्या मार्गदर्शक सूचना तसेच शासनाच्या प्रचलित नियमांचे काटेकोर पालन करणे संबंधित कंपन्यांवर बंधनकारक राहील.


सीएसआर निधीतून होणाऱ्या या बांधकामामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. तसेच शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार आहे, असेही जिल्हाधिकारी गुप्ता यांनी सांगितले.

No comments: