14 July, 2026

किसान सारथी ॲपच्या माध्यमातून शेतीविषयक मार्गदर्शन आता एका क्लिकवर

 

राष्ट्रीय कृषी मतदानात सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 14 : शेतकऱ्यांना शेतीविषयक तांत्रिक मार्गदर्शन, पीक व्यवस्थापनाची माहिती तसेच कृषी तज्ज्ञांचे सल्ले सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी 'किसान सारथी (Kisan Sarathi)' हे मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. या ॲपचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक उत्पादक व सक्षम करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

'किसान सारथी' ॲपद्वारे शेतकऱ्यांना पीक संरक्षण, पीक व्यवस्थापन, शेतीविषयक अद्ययावत माहिती, कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन तसेच विविध कृषी विषयांवरील उपयुक्त सूचना सहज उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.

तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कृषी मतदान (नॅशनल ॲग्रीकल्चरल पोल) उपक्रमात सहभागी होण्यासाठीही शेतकऱ्यांनी 'किसान सारथी' ॲप डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील शेतीविषयक प्रश्नांवर शेतकऱ्यांचे मत जाणून घेण्यात येणार असून, त्याआधारे कृषी धोरणे आणि संशोधनाला दिशा मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर 'किसान सारथी' ॲप डाउनलोड करून त्याचा नियमित वापर करावा. ॲप डाउनलोड करताना किंवा वापरताना कोणतीही अडचण आल्यास कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर (मो. 9765390976) येथे संपर्क साधावा, असेही कृषी विभागाने कळविले आहे.

 

******

No comments: