* ई-केवायसी सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः मोफत
हिंगोली (जिमाका), दि. २८ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची आधार ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, या प्रक्रियेसाठी आपले सरकार सेवा केंद्र अथवा ग्राम स्तरीय उद्योजक (व्हीएलई) यांनी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश सहकार आयुक्त तथा निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी दिले आहेत.
राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत असून, त्यासाठी आधार ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य आहे. ही प्रक्रिया राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रांमार्फत राबविण्यात येत असून, प्रत्येक ई-केवायसीसाठी शासनाकडून निश्चित मानधन संबंधित ग्रामस्तरीय उद्येजकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
या संदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, संबंधित विभागीय अधिकारी तसेच आपले सरकार सेवा केंद्रांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक सेवा केंद्राच्या दर्शनी भागात "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ई-केवायसी सेवा शेतकऱ्यांसाठी पूर्णतः विनामूल्य आहे" असा फलक लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
तसेच कोणत्याही व्हीएलई किंवा सेवा केंद्राकडून ई-केवायसीसाठी शुल्क आकारण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा तसे आढळून आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा व तालुका स्तरावर या प्रक्रियेवर नियमित देखरेख ठेवून शेतकऱ्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहेत.
ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असल्याने कोणालाही कोणतेही शुल्क देऊ नये. तसेच कोणत्याही सेवा केंद्राकडून शुल्काची मागणी झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
********
No comments:
Post a Comment