17 July, 2026

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी जनजागृती उपक्रम विद्यार्थ्यांकडून पालकांना पत्र; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व शाळांना सूचना

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेला व्यापक लोकसहभाग मिळावा, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विशेष जनजागृती उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित व खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना मतदार नोंदणी व पडताळणीबाबत जागृती करणारे पत्र पाठविण्यात येणार आहे. या पत्राद्वारे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे महत्त्व समजावून सांगण्यात येणार असून, प्रत्येक कुटुंबाने गणनाकर्ता (बीएलओ) यांना आवश्यक सहकार्य करून गणना प्रपत्र अचूक भरावे, आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत आणि मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोहोचणारा हा संदेश मतदार जनजागृतीसाठी प्रभावी ठरेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. भविष्यात मतदानाचा हक्क बजावणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद योग्य वेळी मतदार यादीत व्हावी, यासाठी आजच प्रत्येक कुटुंबाने आपली माहिती अचूक नोंदविणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभाग, सर्व मुख्याध्यापक आणि शिक्षकांना हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या असून, विद्यार्थ्यांमार्फत पालकांना पत्र पोहोचवून मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

 

*******

No comments: