26 July, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी


* लाभापासून वंचित राहू नये यासाठी आधार प्रमाणीकरण व अॅग्रीस्टॅक आयडीची प्रक्रियाही पूर्ण करण्याचे आवाहन



हिंगोली(जिमाका), दि. 26  : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यांतील 673 गावांमधील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी दि. 24 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीनुसार जिल्ह्यातील एकूण 44 हजार 213 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी (E-KYC) पूर्ण करणे, बँक खात्याचे आधार प्रमाणीकरण करून घेणे तसेच अॅग्रीस्टॅक आयडी नसल्यास तो तयार करून घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात लाभार्थ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यातील 44 हजार 213 पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी केवळ 4 हजार 158 शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असून, 40 हजार 55 लाभार्थी शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे उर्वरित सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी विलंब न करता जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण तसेच आवश्यक असल्यास अॅग्रीस्टॅक आयडी तयार करून घेण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.

ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यास शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ विनाअडथळा मिळू शकेल. अन्यथा अपूर्ण कागदपत्रांमुळे किंवा आवश्यक प्रक्रियेअभावी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करून योजनेचा लाभ सुनिश्चित करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे यांनी केले आहे.

*******

No comments: