22 July, 2026

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क व सज्ज ठेवावी - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता



हिंगोली, दि. २२ (जिमाका) : जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम, सतर्क व समन्वयाने कार्यरत राहण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण ठेवावी. संभाव्य आपत्तीच्या प्रसंगी तातडीने प्रतिसाद देऊन नागरिकांचे जीवित व वित्तहानी टाळण्यास सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी दिले.

                  जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, पोलीस उपअधीक्षक पी. एम. माकोडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र पुरी,

व्ही. एस. निर्मळ, वि. भा. पत्की, डी. एस. येस्के,एस. डी. बेरसले, डी.एन. बावळे आदी उपस्थित होते.


बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, नदी-नाले व धरणांच्या पाणीपातळीची सद्यस्थिती, पूरप्रवण गावे, आपत्कालीन निवारा केंद्रांची तयारी, बचाव साहित्याची उपलब्धता, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, रस्ते, दूरसंचार व्यवस्था तसेच विविध विभागांनी केलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

                यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी प्रत्येक विभागाने आपत्कालीन कृती आराखडा अद्ययावत ठेवावा, नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवावा, पूरप्रवण भागांवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याची तयारी ठेवावी, तसेच हवामान विभागाकडून प्राप्त होणाऱ्या इशाऱ्यांनुसार तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश दिले.

               तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, महावितरण, ग्रामीण विकास, नगर परिषद, अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल व राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्यात प्रभावी समन्वय ठेवून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

                ****

No comments: