वसमत तालुक्यातील विकासकामांना गती द्या; प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतला विविध विकासकामांचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 27 : वसमत तालुक्यातील विविध विकासकामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, तसेच प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दूरदृश्यप्रणालीद्वारे वसमत तालुक्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सारंग चव्हाण, नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त गणेश गांजरे, मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वसमत येथील गोदाम व क्रीडा संकुलाच्या कामांचा आढावा घेत प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच ट्रॉमा सेंटरसाठी आवश्यक जागा आरक्षित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यास सांगितले.
पारडी येथील एमआयडीसीसाठी हस्तांतरीत केलेल्या जमिनीवरील अतिक्रमणधारकांना नियमानुसार नोटिसा देऊन अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही करावी. खांडेगाव येथील गायरान जमीन नगर परिषद वसमत यांना घनकचरा व्यवस्थापनासाठी द्यावयाची आहे. त्यासाठी मागणी प्रस्ताव अ,ब,क,ड मध्ये भरुन तात्काळ सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिल्या. तसेच टाकळगव्हाण (खोपा) येथील 132 केव्ही वीज उपकेंद्रासाठी रस्ता तयार करणे आणि सतीपांगरा येथील जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेऊन आवश्यक त्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कामांच्या प्रगतीचा आढावा सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून विकासकामांमध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
***

No comments:
Post a Comment