* बालकांचे हक्क, संरक्षण व सर्वांगीण विकासासाठी विशेष बैठक
हिंगोली (जिमाका), दि. 29 : बालकांचे हक्क, संरक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी गावपातळीवर सुरक्षित व बालस्नेही वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि मिरॅकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दाटेगाव (ता. हिंगोली) ग्रामपंचायतीत विशेष बैठक घेण्यात आली.
‘गाव बाल संरक्षण समिती’चे सक्षमीकरण करून दाटेगावला आदर्श ‘बालस्नेही गाव’ बनविण्याच्या दृष्टीने या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शासकीय अधिकारी व मिरॅकल फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी ग्रामपंचायतीला भेट देऊन गाव परिसरातील बालकांच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
या बैठकीदरम्यान ग्रामस्थ, गाव बाल संरक्षण समितीचे सदस्य तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात आला. बालकांचे शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता, बालविवाह प्रतिबंध, बालमजुरी निर्मूलन तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आदी विषयांवर चर्चा झाली.
गाव बाल संरक्षण समिती अधिक सक्षम करण्याचा संकल्प
गावपातळीवर कार्यरत असलेल्या बाल संरक्षण समितीला अधिक सक्रिय व सक्षम करणे, बालकांच्या सुरक्षिततेबाबत पालक, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समितीची जबाबदारी निश्चित करणे, तसेच गावात बालविवाह, बालमजुरी व शाळाबाह्य मुलांची समस्या निर्माण होणार नाही यासाठी सातत्याने दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
“प्रत्येक बालकाला सुरक्षित, भयमुक्त आणि स्नेही वातावरण मिळणे हा त्याचा मूलभूत अधिकार आहे. दाटेगावला बालस्नेही गाव बनविण्यासाठी ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे यावेळी मिरॅकल फाउंडेशन इंडियाच्या प्रतिनिधींनी सांगितले.
या बैठकीस जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती सोनाली तिवाटणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, सरपंच सौ. कन्हैयाकुमारी माने, पोलीस पाटील हनुमान प्रकाश माने, मुख्याध्यापक मोहन शहू, आशा सेविका वनिता भिसे, अंगणवाडी सेविका गोदावरी भिसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळकिशन माने, पदाधिकारी, बाल संरक्षण समितीचे सदस्य व ग्रामस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत दाटेगावला आदर्श ‘बालस्नेही गाव’ बनविण्याचा संकल्प व्यक्त केला.
******

No comments:
Post a Comment