14 August, 2026

राज्यभर शुक्रवारी ‘जलसंधारण दिनाचे आयोजन

 


·         महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरसह विविध उपक्रमांचे आयोजन; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – मंत्री संजय राठोड

 


हिंगोली(जिमाका), दि. 14 : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येत्या 21 ऑगस्ट रोजी राज्यभर ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त उद्या, दि. 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्टपर्यंत जलसंधारण सप्ताह आणि दि. 21 ऑगस्ट रोजी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर यासह  राज्यात विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’, जलसंधारणाची शपथ, युवकांसाठी लघुचित्रफीत स्पर्धा तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड तयार करण्यात आला आहे. नागरिक तसेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी क्यूआर कोड स्कॅन करून या उपक्रमासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

जलसंधारणाबाबत जनजागृती वाढवून पाण्याचे संवर्धन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

******

No comments: