14 August, 2026

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण


हिंगोलीत 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होणार



हिंगोली (जिमाका), दि. 14 : भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन हिंगोली जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात आला आहे.

मुख्य शासकीय कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे, यासाठी इतर सर्व शासकीय कार्यालये, संस्था आदींनी त्यांचे ध्वजारोहणाचे कार्यक्रम सकाळी 8.35 वाजेपूर्वी किंवा सकाळी 9.35 वाजेनंतर आयोजित करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या सर्व निमंत्रितांनी राष्ट्रीय पोशाखात कार्यक्रम सुरू होण्याच्या किमान 20 मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे, असेही प्रशासनाने कळविले आहे.

स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम व समारंभांच्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावताना शासन परिपत्रक तसेच ध्वजसंहितेतील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा योग्य सन्मान राखण्यासाठी गृह विभागाच्या संबंधित परिपत्रकातील निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर होणार नाही, याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

******

No comments: