14 August, 2026

कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; 7 हजार 516 शेतकऱ्यांच्या खात्यात 62.54 कोटी रुपये जमा

 

जिल्ह्यातील 43 हजार 541 पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई-केवायसी करुन घेण्याचे आवाहन



हिंगोली (जिमाका), दि. 14 : शेतकरी सक्षम, शेती समृद्ध आणि महाराष्ट्र अधिक प्रगत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या 7 हजार 516 पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये 62 कोटी 54 लाख 18 हजार 374 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळावा आणि कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य शासनाने सर्व बँकांना दिले आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी नव्याने आर्थिक बळ मिळणार आहे.

ही योजना पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, पात्र शेतकऱ्यांना स्वतंत्रपणे कुठेही अर्ज करण्याची आवश्यकता नाही. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली आहे. तसेच ही यादी ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यादीतील प्रत्येक पात्र शेतकऱ्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. हा क्रमांक घेऊन शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर ॲग्रीस्टॅक नोंदणी करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सोपी असून पात्र शेतकऱ्यांनी विलंब न करता ती पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

हिंगोली जिल्ह्यात या योजनेसाठी एकूण 43 हजार 541 पात्र शेतकरी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी व आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. तसेच ॲग्रीस्टॅकवर नोंदणी न केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

**

No comments: