07 August, 2026

शेतकऱ्यांनी तुती लागवडीसह रेशीम उद्योगाचा लाभ घ्यावा * रेशीम शेती जनजागृती कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 



  

हिंगोली (जिमाका), दि. 7 : जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली येथे केंद्रीय रेशीम मंडळ व जिल्हा रेशीम कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. 6 ऑगस्ट ) रोजी शेतकरी हितकारक चर्चा सभा आयोजित करण्यात आली. ‘मेरा रेशम, मेरा अभियान-2’ या अभियानांतर्गत आयोजित या कार्यक्रमात रेशीम शेतीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा रेशीम विकास अधिकारी विवेकानंद पेटकर, केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम, प्रगतशील शेतकरी कपील सोनटक्के, श्री. शृंगारे, तुती नर्सरी धारक गजानन सोनटक्के तसेच जिल्ह्यातील रेशीम शेतकरी उपस्थित होते.

या कार्यक्रमात रेशीम विकास अधिकारी श्री. पेटकर यांनी सन 2026-27 मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नवीन तुती लागवड व घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले. तसेच यापूर्वी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी तुती लागवड करून रेशीम उद्योगाकडे वळावे, केवळ शासकीय अनुदानाकडे लक्ष न देता वेळेत रेशीम उद्योगाचा खर्च करून रेशीम बाजारपेठेत सुरू असलेल्या तेजीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.

केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम यांनी केंद्रीय रेशीम मंडळामार्फत प्रसारित करण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञान व रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी आवश्यक बाबींची माहिती शेतकऱ्यांना दिली.

प्रगतशील शेतकरी श्री. सोनटक्के व श्री. श्रृंगारे यांनी रेशीम उद्योगात चॉकी किटकांचा वापर करण्याचे महत्त्व विशद केले. चॉकी किटकांचा वापर करून आपण एका एकरातून चार ते पाच पिकांपर्यंत काढू शकतो, याबाबतची माहिती त्यांनी दिली.

रेशीम शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल असून, तुती लागवड, रेशीम किटक संगोपन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उद्योगातून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

 

*******

No comments: