25 August, 2026

मेरा रेशम, मेरा अभिमान-2’ अभियानांतर्गत शेतकरी जागृकता कार्यक्रम संपन्न

हिंगोली, दि. 25 ऑगस्ट : केंद्रीय रेशीम मंडळ व जिल्हा रेशीम कार्यालय, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरा रेशम, मेरा अभिमान-2’ अभियानांतर्गत मौजे लिंबी, ता. हिंगोली येथे शेतकरी जागृकता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा रेशीम विकास अधिकारी विवेकानंद पेठकर, केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम, प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन ढाकरे यांच्यासह परिसरातील पुरुष व महिला रेशीम उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी विवेकानंद पेठकर यांनी तुती लागवड, रेशीम किटकांचे संगोपन तसेच जिल्हा रेशीम कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध अनुदान योजनांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. रेशीम शेती करताना आवश्यक असणाऱ्या बाबी, शासकीय योजनांचा लाभ आणि उत्पादनवाढीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

केंद्रीय रेशीम मंडळाचे वैज्ञानिक डॉ. प्रवीण गेडाम यांनी केंद्रीय रेशीम मंडळामार्फत विकसित करण्यात आलेल्या विविध तंत्रज्ञानाची माहिती दिली. रेशीम शेतीच्या माध्यमातून विविध प्रकारे उत्पन्न मिळविण्याच्या संधी, बाजारपेठेची उपलब्धता तसेच भविष्यातील रेशीम शेतीच्या विविध संधींबाबत त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रगतशील रेशीम शेतकरी गजानन ढाकरे यांनी रेशीम शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न वाढविता येते, असा विश्वास व्यक्त करत आपल्या अनुभवातून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा रेशीम कार्यालयातील श्री. रंभापूरे, श्री. ठमके व श्री. मगर यांनी परिश्रम घेतले.
०००००

No comments: